विभागीय वनाधिकाऱ्यांनी केली चौकशी, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन
चिपळूण : तालुक्यातील तोंडली-वारेली गावच्या सीमेवर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिष महाजन यांच्यावर डेरवण हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, सोमवारी विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी श्री. महाजन यांची भेट घेऊन चौकशी केली. तर त्यांच्या घराचीही पाहाणी करून ग्रामस्थांना काही सूचना करतानाच सतर्क राहण्याचे आवाहन केले.
शनिवारी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास आशिष महाजन यांच्यावर बिबट्याला हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. हल्ल्याचा प्रतिकार करताना झालेल्या झटापटीत बिबट्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिका-यांसह
ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रक्तबंबाळ झालेल्या महाजन यांना डेरवण हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात गेले दोन दिवस उपचार सुरू आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याची तपासणी केली असता तो मृत असल्याचे स्पष्ट झाले. मादी जातीची बिबट्या अंदाजे १ वर्ष सहा महिने ते दोन वर्षांची असल्याचे आणि बिबट्याच्या छातीवर मोठी तर पाय, मानेवरही जखम असल्याचे दिसून आले. बिबट्याच्या नाकाच्या शेंड्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत लांबी १९० सें.मी. होती. पुढील पायाची उंची ५४ तर मागील पायाची उंची ६० सें.मी. इतकी होती. पंजे, नखे, मिशा, दात सुस्थितीत होते. या बिबट्याला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेल्याचे येथील वनविभागाच्या अधिका-यांनी
कोल्हापूरच्या मुख्य वनरक्षकांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. सोमवारी विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह तोंडली-वारेली गावांना भेट देऊन महाजन यांच्या घरासह परिसराची पाहाणी केली. यावेळी त्यांनी या गावातील लोकांना काही सूचना केल्या. परिसरात बिबट्या दिसल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच श्री. महाजन यांच्याही तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात आशिष महाजन हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. तर तालुकावासियांकडून श्री. महाजन यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. सुप्रिया महाजन यांच्या धाडसाचे देखिल कौतुक केले जात आहे.