माथेरान:- शहरात काल मंगळवार( दि.१८) पासून बेमुदत संप पाळण्यात येणार आहे.माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीकडून हा बंद पाळला जाणार आहे. पर्यटकांची होणारी लुबाडणूक रोखण्यास प्रशासन कानाडोळा करत असल्यानेच संघर्ष समितीने हा आवाज दिला असून त्याला हॉटेल इंडस्ट्री, ई-रिक्षा संघटना, व्यापारी, सामाजिक संस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे असे समितीकडून सांगण्यात आले आहे.
थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान मध्ये गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची लूट होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना फसवून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्याचा नवा धंदा काही दलालांनी सुरू केला होता. त्यात घोडेवाल्यांचाही समावेश असल्याचा आरोप माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केला आहे.त्यामुळे याविषयी आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा संघर्ष समितीने दिला.माथेरानमधील सर्व व्यावसायिक प्रशासनाविरोधात आज मंगळवार(दि.१८) पासून कडकडीत बेमुदत बंद पाळणार आहेत. या बंदला मोठा पाठिंबा मिळत आहे.
तसेच माथेरान दस्तुरी प्रवेशद्वार येथे असलेल्या टॅक्सी स्टँड पासून लोखंडी डॉम पर्यंत एकही एजंट,घोडेवाले,हमाल,रिक्षा चालक यांनी येऊ नये.पर्यटकांनी प्रवासी वाहन कर भरल्यावर डोम मध्ये शेवटी माथेरान पालिकेचे माहिती केंद्र विविध प्रकारचे दरपत्रक असावे आणि त्यापुढे घोडे,रिक्षा,हात रिक्षा आणि हमाल यांचे प्रीपेड स्टॉल असावेत.जेणेकरून पर्यटकांना रीतसर माहिती मिळेल आणि पर्यटकांची फसवणूक होणार नाही. अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.