नवी दिल्ली – मतदार ओळखपत्र लवकरच आधार कार्डाशी लिंक केले जाणार आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक होईल, तसेच बनावट मतदार ओळखणे सोपे होणार आहे.
निवडणूक प्रक्रियेत अधिक विश्वासार्हता आणण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, विधी विभागाचे सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव, यूआयडीएआयचे सीईओ आणि निवडणूक आयोगाचे तांत्रिक तज्ज्ञ उपस्थित होते. बैठकीत ठरल्यानुसार मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया संविधानाच्या अनुच्छेद 326 च्या तरतुदींनुसार होईल. यूआयडीएआय आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ज्ञांमध्ये लवकरच पुढील चर्चा होईल असे ठरले. या निर्णयामुळे मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक होईल, तसेच बनावट मतदार नोंदणी रोखली जाईल. यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढेल आणि मतदान अधिक पारदर्शक होईल.