मुंबई:- शेतकऱ्यांच्या विविध योजना राबवताना लॉटरी पद्धत बंद करून प्रथम अर्ज करणाऱ्या लाभार्थीला अग्रक्रम द्यावा तरच रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, असे निवेदन उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी अजय तेंडुलकर यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना रत्नागिरी येथील दौऱ्यावेळी दिले होते.
या निवेदनाची दखल घेऊन कोकाटे यांनी अधिवेशनामध्ये लॉटरी पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सभागृहामध्ये सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या योजना राबवताना अग्रक्रमाने येणाऱ्या लाभार्थींना त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
तेंडुलकर यांना १० फेब्रुवारीला कृषिमंत्री यांच्यासोबत कोकण विभागीय चर्चासत्रासाठी अलिबाग येथे शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी जिल्ह्यातून कृषी विभागामार्फत पाठवण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी कृषिमंत्री यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत चर्चा केली व निवेदनही दिले होते. जिल्ह्यातील लाभार्थींची संख्या कमी असल्यामुळे शासकीय योजनेचा वेळेवर लाभ घेता येत नाही. त्यापासून ते वंचित राहतात. हे लक्षात घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या असणाऱ्या विविध योजनांसाठी लॉटरी पद्धत बंद करावी व प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशा पद्धतीने योजना राबवाव्यात, असे मंत्री कोकाटे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.