उन्हाचा कडाका दिवसेंदिवशी वाढत आहे. त्यामुळे बाजारात लिंबू चांगलेच भाव कडाडले आहेत. बाजारात लिंबाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक लिंबू दर्जांनुसार ८ ते १० रुपयांना एक नग मिळत आहे.
मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने सध्या दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात दर्जानुसार एक गोणी ५०० ते १८०० रुपयांना विकली जात आहे.
बाजारात रसाळ, मोठ्या आकाराच्या लिंबांचे दर जास्त असूनही त्यांना अधिक मागणी होत आहे. या महिनाभरापासून लिंबांना मागणी वाढली आहे. त्यामुळे भावात प्रचंड वाढ झाली आहे. जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील असे मार्केट यार्डातील लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले. मार्केट यार्डात गेल्या दीड महिन्यापूर्वी तीन ते चार हजार गोणी लिंबाची आवक होत होती. मात्र, सध्या ही आवक निम्म्यावर आली आहे.
बाजारात सध्या दीड हजार ते एक हजार ६०० गोणींच आवक होत आहे. त्यातच आता उन्हाच्या वाढत्या झळांमुळे लिंबाला मागणी वाढली आहे. एका गोणीत आकारमानानुसार ३५० ते ४५० लिंबू असतात. सध्या घरगुती वापराबरोबरच हॉटेल्स, रसवंतिगृह आणि ज्यूस सेंटरकडून लिंबाला मोठी मागणी असते.
उन्हाळ्यामुळे लिंबांच्या लागवडीवर परिणाम झाला असून, गेल्या महिनाभरापासून लिंबांची आवक कमी होत आहे. लिंबाला बाराही महिने मागणी असते. मात्र, उन्हाळ्यात ती खूप मोठ्या प्रमाणात असते. जून महिन्यापर्यंत लिंबाचे दर तेजीत राहणार आहेत. पाण्याअभावी लिंबाचे उत्पन्न कमी निघत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम लिंबाच्या उत्पन्नावर होत आहे. – रोहन जाधव, लिंबू व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड