संगमेश्वर:- जलरंग माध्यमातून कोकणचा निसर्ग सर्व दूर पोहोचवणारे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील प्रख्यात चित्रकार विष्णू गोविंद परीट यांनी सलग तीस दिवस विविध विषयांवरील तीस कलाकृती रेखाटून एक विक्रम केला आहे. देश स्तरावरील एका ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत सहभाग घेत त्यांनी हा विक्रम नोंदवला. चित्रकार म्हणून या स्पर्धेत सहभागी होताना विविध विषयांवर कलाकृती रेखाटल्याचा आनंद आपल्याला मिळाल्याचे विष्णू परीट यांनी नमूद केले.
चित्रकार हिना भट या दरवर्षी सलग एक महिना ऑनलाइन चित्र स्पर्धा आयोजित करत असतात. यामध्ये विद्यार्थी, कलाकार अशा विविध गटांचा समावेश असतो. देशाच्या विविध राज्यातून अनेक कलाकार या स्पर्धेत सहभागी होत असतात. कलाकाराने कलाकृती रेखाटनापासून अंतिम कलाकृती साकार होईपर्यंत त्याचे विविध टप्पे कला रसिकांपुढे सादर करणे या स्पर्धेत अपेक्षित असते. दररोज रात्री आठ वाजण्यापूर्वी अंतिम रेखाटन हिना भट यांच्या साइटवर ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक ठेवण्यात आले होते.
जलरंग चित्रकार विष्णू परीट यांनी १५ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेत सहभाग घेतला. ही स्पर्धा १६ मार्च २०२५ रोजी समाप्त झाली. या दरम्यान परीट यांनी जलरंगासह ऑइल पेस्टल या माध्यमात काम केले. विशेष म्हणजे यावेळी केवळ निसर्गावर रेखाटन आणि रंगकाम न करता वेरूळची मंदिरे, बाजार, व्यक्तिचित्रे, गल्ल्या, रस्ते अशा विविध विषयांवर सलग तीस दिवस कलाकृती रेखाटल्या. या स्पर्धे दरम्यान विविध विषय हाताळण्याचा चित्रकार परीट यांनी निश्चय केला होता. एकही दिवस खंड न करता त्यांनी ही ऑनलाईन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल विष्णू परीट यांचे प्रख्यात चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य चित्रकार माणिक यादव, पुणे येथील चित्रकार सतीश सोनवडेकर, चित्रकार दत्ता हजारे, मनोज सुतार, रंगा मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.
हिना भट आयोजित ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत सलग ३० दिवस ऑनलाईन प्रात्यक्षिकांचे देखील आयोजन करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकांचा युवा कलाकारांना चांगलाच लाभ झाला. या प्रात्यक्षिकात महाराष्ट्रातील प्रख्यात चित्रकार मनोज सकळे, अमित ढाणे, सुरभी गुळवेलकर आदींचा समावेश होता.अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करुन कलाकारांना प्रोत्साहन दिल्याबद्दल स्पर्धा ओयोजक हिना भट यांना चित्रकार विष्णू परीट यांनी धन्यवाद दिले आहेत.
दादासाहेबांकडून कौतुक हे स्पर्धेतील सहभागाचे मोठे यश !
या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत सहभाग घेताना आपल्या हातून अधिकाधिक काम व्हावे,असा आपला मुख्य उद्देश होता. याबरोबरच जलरंगासोबत विविध माध्यमे आणि विषय हाताळावे असा आपला मानस होता. आपण रेखाटलेल्या कलाकृती पाहून विविध ठिकाणच्या मान्यवर कलाकारांकडून कौतुक आणि काही सूचनाही येत होत्या. कऱ्हाड येथील विख्यात चित्रकार दादासाहेब सुतार यांनी आपण वेरूळ येथील रेखाटलेल्या कलाकृतीबाबत प्रत्यक्ष संपर्क साधून या कलाकृतीचे कौतुक केले, हा आपल्यासाठी सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. या स्पर्धेसाठी रेखाटलेल्या कलाकृतीं मधील अनेक कलाकृतींना कलारसीकांकडून होत असलेली मागणी आपल्यातील उत्साह वाढवणारी आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या कलाकृती जगभर पोहोचल्या हे माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आहे.