मुख्यमंत्री, वन मंत्र्यांकडे तक्रार, फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
राजापूर : राजापूर तालुक्यातील मौजे सागवे येथील निखारेवाडी येथे असलेल्या कांदळवन वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. याबाबत अखिल भारत हिंदू महासभेचे प्रदेश सरचिटणीस स्वप्नील खैर यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षकाकडे तक्रार करण्यात केली आहे. तसेच उपवन संरक्षक, कांदळवन, विभागीय वन अधिकारी, कांदळवन विभाग दक्षिण कोकण यांच्याकडेही तक्रार केली आहे, मात्र याकडे सारेच दुर्लक्ष करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणत कत्तल होऊनही वनविभाग अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. या कांदळवन कत्तलीत अनेकांचे हात बरबटलेले आहेत असे खैरे यांचे म्हणणे आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सागवे निखारेवाडी येथे कांदळवन वृक्षाची तोड करून त्या ठिकाणी कोळंबी संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. ह्या प्रकल्पा करीता कांदळवन वृक्ष तोडी बाबत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिली असेल त्यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी. तसेच त्या ठिकाणी उत्खनन करते वेळी शिवकालीन तोफ सुद्धा मिळाली आहे. ती तोफ त्याच वाडीतील मंदिरा समोर ठेवण्यात आली आहे. ह्या बाबत पुरातत्व विभागाला कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे. सदर प्रकल्प सुरू करणारे जमीर निजामुद्दीन खलिफे व माजी विधान परिषद सदस्य हुस्नबानो खलिफे (भारतीय काँग्रेस) ह्यांच्या वर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे असे त्यांनी म्हटले आहे.
याबाबतची प्रत रत्नागिरी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रधान सचिव, वन विभाग, वनमंत्री, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य मंत्री, मुख्य सचिव, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री, यांना देण्यात आल्या आहेत.