पालघर:- जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रशासन आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीतील सुकड आंबा शिरसून पाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत टाकी बांधकाम सुरु आहे.
या बांधण्यात येणाऱ्या अपूर्ण पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
ही घटना 17 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये हर्षला रशू बागी आणि संजना प्रकाश राव या सातवीत शिकणाऱ्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली आणखी एक विद्यार्थिनी थोडक्यात बचावली. अपूर्ण असलेल्या या टाकीच्या स्लॅबवर मुली खेळत असताना स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. यामध्ये साधारण 30 फूट उंचीवरून खाली पडल्याने हर्षला आणि संजना यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली एक विद्यार्थिनी स्लॅबला अडकल्याने तिचा जीव वाचला.
स्थानिकांचा ठेकेदारावर संताप, निकृष्ट कामाचा आरोप
या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, पालक आणि स्थानिक नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या पाण्याच्या टाकीचे काम हरेश बोरवेल कंपनीच्या ठेकेदाराने हाती घेतले होते. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. स्थानिकांनी ठेकेदारावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केला आहे.
मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
या हृदयद्रावक घटनेनंतर मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या दुर्घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, ठेकेदाराला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
सरकारी अनास्थेमुळे निष्पाप जीवांचे बळी?
लघर जिल्ह्यात अनेक सरकारी योजना राबवल्या जात असल्या तरी त्यामध्ये सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत, असा आरोप वारंवार होत आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर भविष्यात अशा आणखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकरणात दोषींवर योग्य ती कारवाई होते की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या मृत मुलींच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.