रत्नागिरी : कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णयाचा पुनर्विचार करून हा शासन निर्णय पुनर्जीवीत करावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील 400 कंत्राटी शिक्षकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले.यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये कंत्राटी तत्त्वावरती 672 शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केली होती. या जिल्ह्यामध्ये शाळा उघडण्यासाठी शिक्षक उपलब्ध नव्हते अनेक शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्या होत्या त्यामुळे येथील शैक्षणिक व्यवस्था बिघडली होती ही शैक्षणिक परिस्थिती टिकवण्याचे काम स्थानिक डी.एड., बीएड.धारक आणि पदवीधर शिक्षक यांनी केले होते. ते शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले.
सन 2024 -25 या शैक्षणिक वर्षात 23 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 495 शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या. शासनाने 10 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेल्या शासन निर्णयाप्रमाणे या सर्व शिक्षकांच्या नोकर्या धोक्यात आलेल्या आहेत. हे सर्व शिक्षक बेरोजगार होणार आहेत. ज्या शिक्षकांनी रत्नागिरी जिल्ह्याची शैक्षणिक व्यवस्था वाचवली अशा शिक्षकांवर उपासमारीची वेळ येत असल्याकारणाने रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुदर्शन मोहिते, अजिंक्य पावसकर, संजय कुळये, गिरीष जाधव, रुपेश झोरे, मृदुला देसाई, विनोद कांबळे, अमोल सावर्डेकर, रुपाली वाघे, सुशांत मुंडेकर, योगेश कांबळे, श्रेया कापसे, आरती तांबे, प्रिया गमरे आदी उपस्थित होते.
‘तो’ निर्णय जिल्ह्यासाठी फायद्याचा
रत्नागिरी जिल्हा हा डोंगराळ व अति दुर्गम भागामध्ये वसलेला आहे. या जिल्ह्यातील अनेक शाळा ह्या वाडी वस्तीवर डोंगराळ भागात आहेत त्यामुळे या शाळेतील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर कंत्राटी शिक्षक शासन निर्णय रद्द झाल्यामुळे मोठा परिणाम होणार आहे. या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. अनेक शाळा शून्य शिक्षिकी आहेत. दरवर्षी या जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात बदलीने जाणार्या शिक्षकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे येथील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोकणातील डोंगराळ भागाचा विचार करता तत्काळ पर्यायी शैक्षणिक व्यवस्था म्हणून कंत्राटी शासन निर्णय हा उत्तम पर्याय होता आणि आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. कंत्राटी शिक्षक भरतीमुळे रत्नागिरी जिल्ह्याला याचा मोठा फायदा झाला आहे.