जमाव पांगवण्यासाठी लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पोलिस उपायुक्तांवर हल्ला
नागपूर : औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली.
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी २० तरुणांना ताब्यात घेतले.
सायंकाळच्या सुमारास महालातील चिटणीस पार्क, तसेच गांधी गेट परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. काही तरुणांमध्ये वाद झाला आणि मग वेगवेगळ्या अफवा पसरत गेल्या. यामुळे मोठा जमाव परिसरात जमला. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली. पोलिसांवरदेखील दगडफेक करण्यात आली व धक्काबुक्की करण्यात आली. यात दोन पोलिसांचे कपडेदेखील फाटले. काही समाजकंटकांनी रस्त्यांवरील वाहनांना आग लावली. काही तरुण यावेळी जखमी झाले व त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परिस्थिती लक्षात घेता चिटणीस पार्कात अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांनी शांतता बाळगावी, असे आवाहन केले.
अफवांवर विश्वास ठेवू नका : मुख्यमंत्री फडणवीस
आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुख:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे.
अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पोलिस उपायुक्तांवर हल्ला
नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे रस्त्यावर उतरले होते. जमावाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलिस आयुक्त जखमी झाले. पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावातील काहींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखम झाली. त्यांना प्रथम मेयो रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.