विद्यार्थ्यांच्या कामाप्रती गावकऱ्यांकडून कौतुक
देवरूख:- संगमेश्वर- देवरुख या राज्यमार्गावर शिवने-करंबेळे गावांच्या सीमेवर शनिवारी दि.१५ मार्च रोजी पालखी भेट सोहळा पार पडला. यावेळी मोठी यात्रा देखील भरली होती. या यात्रास्थळी कचरा साचला होता. याचा विचार करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तसेच श्रमप्रतिष्ठा मूल्य जोपासत बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी येथील यात्रा स्थळ परिसराची साफसफाई केली. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या स्वच्छता मोहिमेचे कौतुक गावकऱ्यांकडून होत आहे. गेली अनेक वर्ष या विद्यालयाचे विद्यार्थी यात्रा संपन्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी येथील परिसर स्वच्छ करताना दिसतात.
यात्रेदरम्यान अनेक दुकाने थाटलेली असल्याने प्लास्टिक बाटल्या, कागद, प्लास्टिक रॅपर अशासारखे विविध टाकाऊ पदार्थ तेथेच टाकून व्यापारी निघून जातात. त्यामुळे यात्रेनंतर जवळजवळ एक किलोमीटरच्या अंतरात रस्त्याच्या दुतर्फा कचरा पाहायला मिळतो. हा कचरा साफसफाई करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां अभावी शक्य नसल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील साफसफाई केली. या साफसफाई मोहिमे दरम्यान मुख्याध्यापक प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे, संदीप नटे, शिवने गावचे सरपंच राजू पवार, उपसरपंच अमोल रसाळ, गावचे पोलीस पाटील मनोज शिंदे तसेच शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर उपस्थित होते. यात्रास्थळाच्या साफसफाईनंतर स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाप्रती समाधान व्यक्त केले.