सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांचे निर्देश; रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा
चिपळूण:-महावितरणकडून अभय योजना, मागेल त्याला सौरपंप, प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज आदी ग्राहक हिताच्या विविध योजना सुरू आहेत. ग्राहक कल्याणाच्या या योजनांमध्ये अधिकाधिक ग्राहक सहभागी व्हावेत, यादृष्टीने काम करा. तसेच ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली करत थकबाकी व चालू बिलाची वसुलीचे उद्दिष्ट साध्य करा, असे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी दिले.
रत्नागिरी जिल्ह्यांतर्गत महावितरणच्या उपविभाग कार्यालय स्तरापर्यंतची आढावा बैठक सोमवारी (१७ मार्च) रोजी महानिर्मिती कंपनीच्या पोपळी, चिपळूण (जि.रत्नागिरी) येथे घेण्यात आली यावेळी दिलीप जगदाळे बोलत होते. यावेळी कोकण परिमंडल रत्नागिरीचे मुख्य अभियंता अनिल डोये, वित्त व लेखा विभागाचे महाव्यवस्थापक अनिल बराटे व रत्नागिरी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता वैभवकुमार पाथोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्राहकांच्या वीजबिल भरण्याची संस्कृती रुजवा
ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरण्याकरता ग्राहकांशी संवाद साधा, यातून सर्वच ग्राहकांच्यात वेळेत बिल भरण्याची संस्कृती रुजण्यास मदत होईल. मात्र, तरीही जे ग्राहक वीजबिल भरण्यास टाळाटाळ करत आहेत त्यांची वीजजोडणी तात्पुरत्या वा कायमस्वरूपी तोडण्यात यावी अशी सूचना सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी केल्या.
कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई करणार
ग्राहकांना विविध योजनांच्या अनुषंगाने सेवा देण्यात तसेच घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांच्या चालू बिल तसेच थकबाकी वसुलीत हलगर्जीपणा केल्यास सबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलीप जगदाळे यांनी यावेळी दिला.
बैठकीस रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते व इतर अधिकारी या उपस्थित होते.