खेड:-शहरातील गांधीचौक येथे शिमगोत्सवानिमित्त आलेल्या एका चिमुरड्याच्या गळ्यातून ५ ग्रॅम वजनाची ३५ हजार रूपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून चोरट्याने पोबारा केला होता. या चोरट्याच्या येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी अवघ्या २४ तासात शनिवारी सायंकाळी मुसक्या आवळल्या. त्याच्या अटकेने अन्य घरफोड्या उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने येथील पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.
शहरातील एक महिला चिमुरड्यासह बाजारपेठ येथील गांधी चौक येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शिमगोत्सवानिमित्ताने पालखीतील देवीचे दर्शन घेण्यासाठी आली होती. यावेळी गांधीचौक येथे उसळलेल्या गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने चिमुरड्याच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावत पलायन केले होते. चिमुरड्याच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीस गेल्याचे निदर्शनास येताच महिलेने पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. याशिवाय अन्य ठिकाणीही दागिने चोरीची घटना घडल्याचे समोर आले आहे. पो.नि. नितीन भोयर यांनी पोलीस पथकामार्फत तपास गतिमान करत दोन्ही चोऱ्यांचा छडा लावण्यासाठी संपूर्ण शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातून एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना पोलीस पथकाला आढळला. पोलिसांनी शनिवारी या तरुणास ताब्यात घेतले.