वर्षभरात बलात्काराच्या २५ तर लैंगिक अत्याचाराच्या ८९ घटना
रत्नागिरी : जिल्ह्यात हुंडाबळीची जुनी प्रथा असलेला एकही गुन्हा दाखल नसल्याने ही प्रथा मोडीत निघाल्याचे सध्याचे चित्र आहे. ही एक जमेची बाजू असली तरी गंभीर बाब ही आहे की, महिलांवरील अत्याचाराचे प्रकार काही कमी होत नसल्याचे पोलिसांत नोंद असलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षभरात बलात्काराच्या २५ घटना घडल्या असून, लैंगिक अत्याचाराचे ८९ प्रकार घडले आहेत. २ अनैतिक व्यापार, तर एक अपहरणाचा प्रकार घडला आहे. रत्नागिरी तालुका अशा गुन्ह्यांमध्ये आघाडीवर आहे.
जिल्हा पोलिस दलामध्ये अत्याचार झालेल्या महिलांबाबत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हुंड्यासाठी मुलीचा छळ केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक मुलींचा हुंडाबळी गेला आहे; परंतु आता कडक कायद्याच्या भीतीने त्याला काहीसा चाप बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तर हुंडाबळीची एकही घटना घडल्याची नोंद पोलिसांत नाही. यावरून जिल्ह्यातील ही जुनी परंपरा मोडीत निघत असल्याचेच हे द्योतक आहे. समाजसुधारणेचे हे एक चांगले उदाहरण असले तरी दुसरीकडे महिलांवरील अत्याचारांचे प्रकार काही कमी होताना दिसत नाहीत.
जिल्हा पोलिस दलाकडे नोंद झालेल्या २०२३-२४ मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांची आकडेवारीमिळाली आहे. या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील महिला किती असुरक्षित आहेत, हे स्पष्ट होत आहे. वर्षभरात जिल्ह्यात बलात्काराच्या २५ घटना घडल्या आहेत. रत्नागिरी, चिपळूण, खेड तालुक्यांमध्ये जास्त आहेत. उर्वरित तालुक्यात त्या तुलनेत कमी आहेत. राजापूर तालुक्यात एकही बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद नाही. अपहरणाचा एकच गुन्हा दाखल असून, तो रत्नागिरीत घडला आहे तर महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात तर मोठी वाढ झाली आहे. वर्षभरात ८९ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद पोलिस.दप्तरी आहे. यामध्ये रत्नागिरीत २२ गुन्हे घडले आहेत. त्या खालोखाल खेड १७, दापोली १२, राजापूर ६, संगमेश्वर ६, लांजा ४, मंडणगड ३ असे असून, गुहागर तालुक्यात एकही लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडलेला नाही. या आकडेवारीवरून महिला सुरक्षेवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलिसांचे प्रयत्न पण…
जिल्हा पोलिस दलाने महिला सुरक्षेच्यादृष्टीने ११२ हेल्पलाईन नंबरसह दामिनी पथक व अन्य कायदेशीर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पोलिस महिलांवरील अत्याचार रोखण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत असले तरी गुन्हेगार निर्वावल्यामुळे हे प्रकार वाढत चालल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अनैतिक व्यापारासह इतर ५९ गुन्हे
अनैतिक व्यापर केल्याप्रकरणी २ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये खेड आणि रत्नागिरी तालुक्यांत प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे, तर इतर ५९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील महिला किती सुरक्षित आहेत हे पोलिस आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.