मुंबई:- वुमन्स प्रीमीयर लीग 2025 स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान मुंबई इंडियन्सला मिळाला आहे. मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ८ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे.
याआधी २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा विजेतेपद मिळवले होते.तर दिल्ली कॅपिटल्स सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यांना तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई इंडियन्सला 149 धावांवर रोखून विजयासाठी 150 धावांचं आव्हान स्वीकारले.पण दिल्ली कॅपिटल्सने झटपट विकेट गमवल्या आणि या सामन्यात पराभव मिळवला. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्सचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं. तीन वर्षात थेट अंतिम फेरी गाठणारा दिल्ली हा एकमेव संघ आहे. मात्र तिन्ही वेळेस पदरी निराशा पडली.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना झटपट विकेट गमावल्या. त्यामुळे दडपण वाढलं होतं. यास्तिका भाटिया आणि हिली मॅथ्यूज स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर नॅट स्कायव्हर ब्रंट आणि हरमनप्रीत कौर यांनी 88 धावांची भागीदारी करत संघाला सावरलं. ब्रंट 30 धावा करून बाद झाली आणि त्यानंतर झटपट विकेटची रांग लागली. मात्र यावेळी हरमनप्रीत कौरने 44 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 66 धावा केल्या. तर तळाशी आलेल्या अमनजोत कौर आणि संस्कृती गुप्ताने काही धावा जोडल्या. त्यामुळे 149 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 141 धावा केल्या आणि सामना 8 धावांनी गमावला.
शेवटच्या षटकात दिल्ली संघाला 14 धावांची गरज होती आणि नॅट स्कायव्हर ब्रंट गोलंदाजीसाठी आली होती. निक्की प्रसाद स्ट्राईकला होती. दिल्ली कॅपिटल्सच्या हाती फक्त एक विकेट होती. पहिल्या चेंडूवर निकीने एक धाव घेतली आणि चरणीला स्ट्राईक दिला. दुसऱ्या चेंडूवर चरणीने एक धाव घेत निक्कीला स्ट्राईक दिला. तिसरा चेंडू निर्धाव गेला आणि मुंबईच्या पारड्यात सामना पूर्णपणे झुकला. चौथ्या चेंडूवर निक्कीने 1 धाव घेतली आणि 2 चेंडूत 11 धावा अशी स्थिती आली. पाचव्या चेंडूवर चरणीने एक धाव घेतली आणि सामना मुंबईने जिंकल्यात जमा झाला. कारण एका चेंडूत 10 धावांची गरज होती आणि चमत्काराशिवाय पर्यात नव्हता. शेवटच्या चेंडूवर निक्कीने एक धाव घेतली आणि मुंबईने सामना 8 धावांनी जिंकला.