राजापूर:- राजापूरची शांततेची व जातीय सलोख्याची परंपरा कायम राखावी. सोशल मीडियावर कुणीही चुकीच्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करू नयेत, सगळ्या ग्रुप अॅडमिननी आपले ग्रुप ओन्ली अॅडमिन कॅन सेंड मेसज सेटिंग करावेत, असे आवाहन राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे यांनी आज केले.
राजापुरात गेल्या बुधवारी घडलेल्या वादानंतर व सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले वेगवेगळे मेसेज आणि भविष्यात असणारे सण या पार्श्वभूमीवर श्री. गंबरे यांनी आज तालुका शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. तहसीलदार दालनात झालेल्या या बैठकीला उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, राजापूर पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आदी उपस्थित होते.
श्री. गंबरे यांनी सांगितले की, शहर आणि तालुक्याची शांतता अबाधित राखण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. घडलेल्या घटनांप्रकरणी पोलीस प्रशासन योग्य प्रकारे चौकशी करून कायदेशीर प्रक्रिया अवलंबून कार्यवाही करत आहे. मात्र तरीही आपण सगळ्यांनी समाजातील एक प्रमुख घटक म्हणून पुढाकार घेत दोन्ही समाजात कशा प्रकारे एकोपा टिकवून राहतील, यासाठी प्रयत्न करावेत. सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर चुकीचे मेसेज, व्हिडिओ व्हायरल होत असून याबाबतही सायबर सेलकडून योग्य ती कार्यवाही केली जात आहे. मात्र एक जागरूक नागरिक म्हणून अशा मेसेजना पायबंद घातला पाहिजे, तसेच जे काही आपले सोशल मीडियाचे ग्रुप असतील त्यावर असे मेसेज फॉर्वर्ड करण्याऱ्यांना सूचना द्याव्यात, पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, सगळे ग्रुप ओन्ली अॅडमिन कॅन सेंड मेसेज असे सेटिंग करावेत असे आवाहन त्यांनी केले.
आज सोमवारी साजरी होणारी शिवजयंती, रमजान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा व अन्य सर्वच सण परंपरेनुसार शांततेत साजरे करावेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही गंबरे यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी देखील शांततेचे आवाहन केले व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
यावेळी राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, माजी नगराध्यक्ष एड. जमिर खलिफे, जयप्रकाश नार्वेकर, लियाकत काझी, सुलतान ठाकूर, महादेव गोठणकर, आजिम जैतापकर, हुसैन मुंगी, मधुकर पवार, विनय गुरव यांनी आपली मते मांडली. बैठकीला राजापूर अर्बन बँक अध्यक्ष संजय ओगले, राजापुरातील मुस्लिम समाज पाच मोहल्ला समिती अध्यक्ष शौकत नाखवा, अनिक कुडाळी, सुभाष पवार, सुरेंद्र तांबे, प्रसन्न मालपेकर, विजय हिवाळकर, लियाकत काजी, कलिम चौगुले आदींसह हिंदू-मुस्लिम समाजातील व्यापारी, नागरिक व शांतता समिती सदस्य उपस्थित होते.