रत्नागिरी:- जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही संकटाच्या वेळी तसेच त्यांच्या तक्रारींचे, अडचणींचे निवारण होऊन त्यांना आवश्यक ती सर्व मदत मिळावी या हेतूने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने 8390929100 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.
घरातील तरुण पुरुष व महिला या नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई व इतर शहरांमध्ये वास्तव्यास असल्याने घरामध्ये ज्येष्ठ नागरिक एकटेच असतात. तसेच निराधार ज्येष्ठ नागरिक घरामध्ये एकटेच असतात. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या तत्काळ मदतीसाठी व त्यांच्या तक्रारींचे अडचणीचे निवारण करण्यासाठी हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. हा क्रमांक २४ तास सुरू असणार आहे. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असून त्यांच्या सुरक्षेची प्राधान्याने काळजी घेण्यासाठी रत्नागिरी पोलीस कटीबद्ध आहेत.
ज्येष्ठ नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी या हेल्पलाइन नंबरवर फोन करावा. हा व्हॉट्सअॅप क्रमांक आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप मेसेज करावा, असे आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.