देवरुख:- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिज्ञासू ग्राहक गटाच्या माध्यमातून ‘जागतिक ग्राहक हक्क दिना’निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या राष्ट्रीय सहसचिव सौ. नेहा जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या स्वागतानंतर व्याख्यानाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर व्याख्यात्या नेहा जोशींसह पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, प्रा. धनंजय दळवी, प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. सीमा कोरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जिज्ञासू ग्राहक गट समन्वयक प्रा. शिवराज कांबळे यांनी केले.
सौ. नेहा जोशी यांनी पीपीटीच्या साह्याने महत्त्वपूर्ण माहिती उपस्थिताना दिली. सौ. जोशी यांनी आपल्या व्याख्यानात ग्राहक हक्क दिनाच्या आयोजनाचा उद्देश, प्रत्येक व्यक्ती ग्राहक असल्यामुळे कायद्याने ग्राहकांना दिलेले हक्क व अधिकार, ग्राहक संरक्षण कायदा: २०१९ मधील ग्राहकांसाठी असणाऱ्या महत्त्वपूर्ण तरतुदी याबाबत सविस्तर विवेचन केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य, सुवर्ण जयंती वर्षानिमित्त ग्राहक पंचायतीच्या ‘शोषणमुक्त समाज’ निर्मिती मागील असणारा उद्देश, भूमिका व कार्य याबाबत सविस्तर आढावा घेतला. भारतामध्ये सोने खरेदीमध्ये होणारी फसवणूक आणि त्याबाबत कसे जागृत राहावे, आरोग्य विम्यामधून विमा कंपन्यांकडून ग्राहकांची विविध मार्गाने होणारी फसवणूक, शाश्वत जीवनशैलीसाठी प्रत्येकाची असणारी जबाबदारी, तसेच जमीन, जंगल, पाणी, विविध प्रकारची ऊर्जा यासंबंधीचा काटकसरीचा वापर, प्लास्टिक मुक्तीमधील सर्वांची जबाबदारी याबाबत विविध उदाहरणे देऊन सविस्तर माहिती विशद केली.
खरेदीमध्ये स्वस्त महागच्या मागे न धावता खरेदी करताना कशा प्रकारे दक्ष राहिले पाहिजे, भारतीय मानक ब्युरोचे कार्य, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनची गरज व महत्त्व याबाबत माहिती दिली. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना प्राप्त झालेले अधिकार यावर भाष्य केले. जाहिरातीद्वारे ग्राहकांची होणारी फसवणूक, खरेदी बाबतचे नियोजन, सेंद्रिय शेती उत्पादनांचा वापर अशा मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ऑनलाइन खरेदी करत असताना ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी, सायबर क्राईमबाबत घ्यावयाची दक्षता, डबाबंद खाद्यपदार्थ व औषधे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर आढावा घेतला.
स्थानिक बाजारपेठेतून वस्तू व सेवा खरेदी करण्याविषयी आग्रह व्यक्त करताना त्यामागील उपयुक्तता स्पष्ट केली. विविध उत्पादने व सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी सरकारसोबत अनुचित व्यापारी प्रथांना पायबंद घालण्यासाठी सहकार्य करण्याचे अवलंबलेले धोरण, हेच खरे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीला आलेले मोठे यश असल्याचे नमूद करून आपल्या व्याख्यानाची सांगता केली. व्याख्यानाच्या समाप्तीनंतर सौ. जोशी यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी आभार प्रदर्शन केले. जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या औदित्याने विद्यार्थ्यांनी आशयपूर्ण भित्तिचित्रे तयार केली होती.
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गामध्ये ग्राहकांचे हक्क व अधिकार, उत्पादक व विक्रेत्यांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक व त्यावरील उपाय, शाश्वत जीवनशैलीचे महत्व, ग्राहक म्हणून कोणतीही खरेदी करताना घ्यावयाची दक्षता, अन्नधान्य व उत्पादनांमधील भेसळ याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुपवर विविध प्रकारची माहिती व लेख पाठवण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विजय मुंडेकर, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. देवयानी जोशी यांच्यासह सहाय्यक महेंद्र मेचकर व अमोल वेलवणकर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, राहुल फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.