संदीप लाड/श्रीवर्धन:-बोर्लीपंचतन मधील शिमगा म्हणजे प्रत्येक बोर्लीतल्या माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. बोर्लीपंचतनमध्ये होळी साजरी करण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाची परंपरा म्हणजे उत्सवाची पालखी ही होय.
होळीच्यावेळी ग्रामदेवतेची पालखी निघते आणि ती नाचवली जाते. सगळ्या कोकणात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातून लोक येतात. ढोल ताशे वाजायला लागले की प्रत्येक बोर्लीपंचतनमध्यला माणसाच्या अंगात शिमगोत्सव संचारतो.
वर्षभर बोर्लीपंचतनमधील माणसं या सणाची वाट पाहत असतात. याच उत्सवासाठी मुंबईतले चाकरमानीही बोर्लीची वाट धरतात.बोर्लीपंचतनमधल्या शिमगोत्सवात सगळयात प्रसिद्ध आहे तो पालखी महोत्सव. डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा उत्सव असतो. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो लोक गर्दी करतात. बोर्लीपंचतन,कापोली,शिस्ते,वडवली या ठिकाणी मोठया उत्सहात हा उत्सव साजरा होतो. प्रत्येक गावात पालखी उत्सव थोड्या फरकाने साजरा केला जातो. ग्रामदेवतच्या मंदिरातून ग्रामदेवतेची पालखी निघते.
ही पालखी नाचवण्याची प्रत्येक गावातील पद्धत वेगळी आहे.बोर्लीपंचतनमधील पंच कमिटी व सर्व समाजबांधवांच्या पुढाकाराने या गावामध्ये पालखी शांतपणे नाचवण्यात येते,बोर्लीपंचतनमधील प्रत्येक घर आणि प्रत्येकजण आपसातले मतभेद विसरून या सोहळ्यासाठी एकत्र येतात.
यावर्षी जवळपास लांब पल्ल्याच्या प्रवास करुन अनेक या उत्सवात या सोहळ्यात सहभागी होतात. होळी व शिमगा उत्सवात साजरा करायचा आणि यानिमित्तान चार क्षण सगळ्यांबरोबर आनंदाने घालवायचे, बोर्लीपंचतनमधील शिमगोत्सव म्हटला की होळीच्या आधी एकमेकांच्या नावाने शिमगा करणारी हिच बोर्लीतील माणसं या सोहळ्याला मात्र मनापासून एकत्र येतात,गावातल्या प्रत्येक घरापुढे ही पालखी येते सुवासिनी तिची पूजा करतात तिच्यापुढे नवस बोलतात आणि पालखी पुढच्या घरी जाते.या पालखी सोहळ्यासाठी बोर्लीच्या बाहेर असलेले सगळे लोकही आवर्जून आपापल्या घरी पोहचतात आणि पालखी सोहळ्यातून भरपूर ऊर्जा आणि उत्साह घेऊनच पुन्हा परततात.