मुंबई – इफ्तार पार्टीला गेले म्हणजे मुस्लिमांना पाठिंबा दिला आणि नाही गेले म्हणजे विरोध केला असा काही गैरसमज विरोधक पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे गैरसमज पसरवू नका, मुस्लीम आमचे दुश्मन नाहीत अशा शब्दात शिंदेसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी विरोधकांना फटकारलं आहे.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही इफ्तार पार्टीला कुठेही विरोध केला नाही. आम्ही मुस्लीम विरोधी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न काही विरोधक करतायेत. आम्ही मुस्लीम विरोधक नाही. जे या देशात राहून देशाला विरोध करतायेत त्यांच्याविरोधात आमची मोहिम आहे. मुसलमानांनी नमाज पढू नये असं आम्ही म्हटलं नाही. इफ्तार पार्टी देणे हा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. त्याला जाणे किंवा येणे त्यात काही वावगं नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच काही लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. ती बदलण्याचं काम सरकार करतंय. संजय राऊत विद्वान माणूस आहे. पाकिस्तानातले लोक त्यांच्या देशात कंटाळले आहेत. सर्वांनी एक राहावे ही भूमिका सरकारची आहे त्यामुळे विभाजनाचा प्रश्न कुठेही उद्भवत नाही. संजय राऊत कोण आहे? पाकिस्तानचा झेंडा रॅलीत घेऊन मिरवणारे हे लोक आहेत. या लोकांना हिंदुत्वाशी आणि शिवसेनाप्रमुखांशी काही देणेघेणे नाही. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चेपायचा नवीन उद्योग सुरू केला आहे असं सांगत मंत्री शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.
दरम्यान, विरोधकांना आजकाल औरंगजेबाबद्दल जास्त प्रेम वाटायला लागलं आहे. जर एवढेच प्रेम असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास औरंगजेबाशिवाय कळत नसेल तर औरंगजेबाचे पुतळे उभा करू ना…हे काय बोलणं झाले का, औरंगजेबाचं नामोनिशान मिटलं पाहिजे. अमेरिकेने लादेनला मारले, त्याला समुद्रात टाकून का दिले, त्याची कबर का बांधली नाही. कसाबची कबर का बांधली नाही. धार्मिक काहीतरी टीप्पणी करायची आणि वातावरण निर्मिती करायची असं विरोधक बोलतात. औरंगजेबाची कबर निस्तनाबूत झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे असंही मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.