नागपूर:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाती, धर्माबाबत मोठं विधान केलंय. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, सार्वजनिक संवादात मी जाती आणि धर्म आणत नाही. कारण मला विश्वास आहे की लोक समाजसेवा सर्वोच्च मानतात.
मंत्रीपद गमावण्याची पर्वा न करता मी यावर कायम राहिलो असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय.
गडकरी ननमुदा संस्थेच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. त्यांनी म्हटलं की, आम्ही कधी जात धर्मात भेदभाव करत नाही. मी राजकारणात आहे आणि इथं खूप काही बोललं जातं. पण मी ठरवलं की मी माझ्या पद्धतीने काम करेन. मी हा विचार करणार नाही की मला कोण मत देईल. माझ्या मित्रांनी मला सांगितलं की असं नाही बोललं पाहिजे. पण मी माझ्या आयुष्यात हाच सिद्धांत ठरवला. मी निवडणूक हरलो किंवा मंत्री पद मिळालं नाही तरी मला काही फरक पडणार नाही.
आमदार असताना अंजुमन ए इस्लाम संस्थेला इंजिनिअरिंग कॉलेजची परवानगी दिली होती. तेव्हा मला वाटलं की त्याची जास्त गरज होती. जर मुस्लिम समाजातून जास्त इंजिनिअर, आयपीएस आणि आयएएस अधिकारी झाले तर सर्वांचा विकास होईल असं म्हणत नितीन गडकरी यांनी देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं उदाहरण दिलं.
नितीन गडकरी म्हणाले की, आज हजारो विद्यार्थी अंजुमन ए इस्लामच्या बॅनरखाली इंजिनिअर बनले आहेत. जर त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नसती तर काहीच झालं नसतं. हीच शिक्षणाची ताकद आहे आणि आयुष्य, समाजाला बदलू शकते.