रत्नागिरी:- तालुक्यातील फणसवळे येथील आंबा बागेत फासकी तोडून तिथेच बसलेला बिबट्या आढळला. हा बिबट्या निपचित पडलेला होता. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू केला असताना तो बिबट्या बेशुद्ध पडला आणि काही काळानंतर त्या बिबट्याचा मृत्यू झाला.
रविवारी सकाळी साडेसात वाजता मौजे फणसवळे येथील भगवान श्रीपत पाटील यांच्या आंबा कलम बागेत गुरखा फेरी मारत असताना बिबट्या फासकी तोडून फासकीसहित बागेत बसलेला दिसून आला. याबाबत वन विभागाला कळविल्यानंतर वनपाल पाली, वनरक्षक जाकादेवी यांनी जागेवर जाऊन खात्री केली असता त्या बिबट्याच्या कमरेला फासकी लागलेली दिसून आली. तो फासकी तोडून आलेल्याचे निदर्शनास आले.
बिबट्या हा मोठमोठ्याने धापा टाकत असलेला दिसून आला तसेच निपचित पडत असलेला दिसून आला. तत्काळ रेस्क्यू टीम व पिंजरा बोलवून पोलिसांच्या माध्यमातून ग्रामस्थांना बाजूला करण्याचे काम करून, पिंजरा व जाळीच्या सहाय्याने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच बिबट्या जागेवरच बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर थोड्याच वेळात बिबट्या मृत झाला. या आंबा कलम बागेला सभोवर दगडी बांध असून त्यावर काटेरी कुंपण आहे. बिबट्या मृत झाल्याने पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी झाडगाव यांच्याकडून शवविच्छेदन केले.
बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे सात वर्षे वयाचा आहे. मृत शरीर सर्व अवयवांसहित जाळून नष्ट करण्यात आलेले आहे. सदर कामी वन विभागाने गुन्हा नोंद केलेला असून ती फासकी कोठे व कोणी लावली याबाबत वन अधिकारी शोध घेत असून पुढील तपास चालू आहे. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी-चिपळूण गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी-चिपळूण प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
सदर कामी ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी एएसआय सावंत, भाटले, पोलीस हवालदार पालवे मॅडम, होमगार्ड पालते व नाखरेकर यांचे तसेच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस पाटील सुजाता आंबेकर यांचे सहकार्य लाभले. सदरचे काम परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, वनपाल पाली न्हानू गावडे, वनरक्षक जाकादेवी शर्वरी कदम, वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे, रेस्क्यू टीम अनिकेत मोरे, महेश धोत्रे हे उपस्थित होते.