डोंगरची काळी मैना म्हणून ओळख असलेल्या करवंदावर यावर्षी हवामानातील बदलाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कोकणात मुबलक प्रमाणात आढळणारी करवंद यावर्षी मात्र फार कमी प्रमाणात दिसून येत आहेत.
करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाट, कोकण आणि रायगड जिल्ह्यात खूप प्रमाणात मिळत. डोंगरकपारीत ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहावयास मिळतात. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आंबा, काजू, फणस, कलिंगडबरोबरच या काळात रानमेवाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. मात्र करवंदाची झुडपे ही काटेरी आणि घनदाट हिरवी आकाराने लहान असल्याने शेताच्या कुंपनासाठी मानवाकडून या झुडपांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. ससा, रानडुक्कर यांसारखे प्राणी या झुडपांचा आसरा घेतात. तसेच वनव्याच्या भक्षस्थानी ही वृक्ष मोठ्या प्रमाणात आल्याने करवंदाची झुडपे नामशेष होत चालली आहेत.
वर्षातून एकदा मिळणाऱ्या या फळांना उन्हाळ्यात आबालवृद्ध आवर्जून चवीने खाताना दिसतात. उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात. चवीने आंबट-गोड असणारे करवंद खट्टा-मिठा या नावाने देखील ओळखली जातात. करवंद हा रानमेवा डोंगरकड्यांवर मिळतो. असंख्य काट्यांमध्ये लपून बसलेल्या करवंदामुळे अनेक शारीरिक व्याधी बरी होतात.
करवंद हे उतार अन्न आहे. उतार म्हणजे हे खाल्ल्याने इतर औषधांचा गुण जातो व इतर औषधी, गोळ्या, इंजेक्शन लागू पडत नाही. उतार अन्न म्हणून करवंद व जांभूळ या जुळ्या बहिणी आहेत. उतार अन्न असल्यामुळे वर्ण (व्रण किंवा जखम) झाल्यास करवंद मुळीच खात नाही.
करवंद अनेक अर्थाने गुणकारी
हिरव्या करवंदाचे लोणचे चटणी तसेच पिकलेल्या करवंदाचा सरबतही केला जातो. करवंदाचे औषधी गुणधर्म आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर तसेच गुणकारी आहेत.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यात करवंदाची फळे खूप लाभदायक ठरतात. रक्तातील कमतरता, अशक्तपणा जाणवत असेल तर करवंद गुणकारी आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचाविकार बरे होतात, रक्तवाहिन्यांमधील चरबीचे प्रमाण कमी होते, उष्णतेचे विकार बरे होतात, अपचनाचा त्रास होत असेल तर करवंदाचं सरबत गुणकारी आहे.
दिवसेंदिवस दुर्मीळ
८०-९० च्या दशकापर्यंत उन्हाळा सुरू झाला की गावांतील छोट्या-मोठ्या बाजारपेठात डोंगरची काळी मैना स्थानिक शेतकरी विकायला आणायचे.
एका टोपलीत असंख्य काळी भोर अशी लहान टपोरी करवंद असायची. पानांचा घडी मारून लहानसा द्रोण तयार करून करवंद विकली जायची.
त्याकाळी आवडीने खाल्ली जाणारी करवंद आता मात्र काळानुरूप दिवसेंदिवस दुर्मीळ होत आहेत.
सध्या बाजारात फार कमी वेळा करवंद पाहायला मिळतात. निसर्गाच्या लहरीपणामुळे करवंदासारखा रानमेवा वर्षागणिक दुर्मीळ होत आहे.