रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या पॅसेन्जर गाडीत तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. इफराज इतिखान अलजी (रा. कुरधुंडा खुर्द मोहल्ला, संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. इफराज हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून जामिनासाठी त्याने रत्नागिरी सत्र न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायाधीश सुनिल गोसावी यांनी इफराज याचा जामन अर्ज फेटाळून लावला. सरकारी पक्षाच्या वकिलांना सहाय्य म्हणून फिडीतेच्यावतीने अॅड. मनिष नलावडे यांनी युक्तीवाद केला. २२ फेब्रुवारीला पिडीत तरुणी ही सकाळी साडेपाच वाजता रत्नागिरी दिवा पॅसेन्जर गाडीने खेड येथे जात होती. सकाळी गाडीला जास्त प्रवासी नसल्याने ती बसलेल्या गाडीचा डबा रिकामाच होता. सकाळी सव्वा पाच्या सुमारास संशयिताने तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी पिडीत तरुणीने रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित इफराज अलजी विरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली होती.