संगमेश्वर:- तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे भीषण वणवा लागला होता. हा वणवा शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मानसकोंड येथे लागला. मानसकोंड येथील एका गुराच्या गोठ्याच्या जवळ हा वणवा पोचला. आंबेड गावचे सरपंच सुहास मांयगडे व ग्रामस्थांनी वेळीच आग विजवून गोठ्याचे संरक्षण केले. ही आग पुढे सरकत आंबेडच्या दिशेने जात होती. याची कल्पना उपसरपंच शोएब भाटकर यांना देण्यात आली.शोएब भाटकर यांनी त्वरित सलाउद्दीन बोट, कासम भाटकर, आयुब शिरगावकर, हशमत शिरगावकर, हसीना शिरगावकर, मुनीरा बोट, निसार केळकर, असगर भाटकर, नाजीम आंबेडकर या ग्रामस्थांना सोबत घेऊन लागलेला वणवा विझवण्यासाठी गेले. कोणी बादली,मग,घमेले, ड्रम, हंडा, कळशी हातात मिळेल ते साहित्यात पाणी घेऊन आग विझविण्यासाठी धावत होते.
भर दुपारी आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. शेवटी उपसरपंच शोएब भाटकर यांनी म्हात्रे कंपनीला विनंती करून त्वरित पाण्याचा टँकर मागवला. आणि आग विझविण्यासाठी प्रयत्न करू लागले.
याची कल्पना तलाठी श्री.जाधव यांना मिळताच त्यांनी देवरुख तहसीलदार यांना माहिती दिली आणि देवरुख येथून अग्निशामक दलाची गाडी मागवली.
याचवेळी आंबेड इथे शिमगोत्सवाचा कार्यक्रम सुरू होता. ग्रामस्थ शिमगोत्सवात व्यस्त होते.मात्र काही सुजाण ग्रामस्थांना वणव्याची माहिती मिळताच आग विझविण्यासाठी धाव घेतली.
यावेळी संगमेश्वर पोलिस बीट अंमलदार श्री.शेलार आणि पोलिस पाटील फेपडे हे देखील हजर झाले. सर्व यंत्रणांनी त्वरित दखल घेतल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य झाले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. ही लागलेली भीषण आग सायंकाळी पाच वाजता आटोक्यात आली.