चिपळूण:-माणुसकीला काळीमा फासणारी घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे सावत्र बापाने आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार नराधम बापावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी लहान असताना आईने एका पुरुषाबरोबर लग्न केले होते. दोघेही मोलमजुरी करून पोट भरतात. चार-पाच वर्षे ते चिपळूणत वास्तव्यात आहे. त्याने पीडित मुलीचा संभाळ करण्याचे वचन दिले होते मात्र मुलगी मोठी झाल्यानंतर त्याची मुलीवर वाईट नजर होती. त्याला दारूचे व्यसन आहे. पत्नी घरी नसताना तो त्या मुलीशी अश्लील चाळे करत असे. शिवाय तिला अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत असे.बापाच्या या कृत्याला कंटाळून पीडित मुलीने समाजसेविका राधा लवेकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कांबळी यांच्या मदतीने चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नितीन अविनाश कदम असे नराधम बापाचे नाव आहे. १३ मार्च रोजी पोलिसांनी त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.