महिला दिनी ठराव मंजूर
गुहागर : जिल्ह्याला हेवा वाटावा असं काम गुहागर तालुक्यातील पाचेरीआगर या गावाने केल आहे. चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्थेने राज्य शिव्यामुक्त करण्याचा संकल्प केलेला आहे. त्या अनुषंगाने संस्थेच्या पुढाकाराने गुहागरमधील पाचेरी आगर गावात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या महिला सभेत शिव्या मुक्त गाव करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला आहे. शिव्या मुक्त गाव करणारं पाचेरी आगर हे कोकणातील एकमेव गाव ठरलं आहे. पाचेरी या ग्रामपंचायतीत तसा ठराव करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचेरी आगर गाव असा ठराव करणारं पहिलं गाव ठरलं आहे. त्यामुळे या गावचे प्रशासक, ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामसेवक, महिलांनी तसेच ग्रामस्थांनी एकमुखी हा ठराव केल्यामुळे या सर्वांचे कौतुक होत आहे. सर्व ग्रामपंचायतीने या गावाचा आदर्श घेण्याचे आवाहन चक्रभेदी फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त जि.प. पु. प्राथमिक केंद्र शाळा पाचेरी आगर नं. १ व चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पाचेरी आगर, गुहागर येथे जागतिक महिला दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला. सदर कार्यक्रमाला पाचेरी गावातील सर्व महिला उपस्थित होत्या. प्रथम थोर समाजसेवक नंदकुमार मोहिते यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. नंतर दीपप्रज्वलन केले गेले.पल्लवी पवार यांनी प्रास्ताविक केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात स्वागत गीत गायले.सदर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका वैदेही सावंत यांनी गावामध्ये मुलं आपल्याला सोडून रोजगारासाठी शहराकडे जात आहेत हे थांबवण्यासाठी सर्व महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत. विधवा अनिष्ट प्रथा म्हणजेच नवरा वारल्यानंतर जोडवी काढणे, मंगळसूत्र तोडणे, कुंकू पुसणे इ. हे वाईट आहे ही प्रथा आपण बंद केली पाहिजे असे सांगितले. ८ मार्चला महिला सभा घेऊन महिलांचे प्रश्न, उपाययोजना या संदर्भातले ठराव घेण्याचे प्रांत अधिकाऱ्यांचे पत्र असल्याची आठवण करून देत यशदा ट्रेनर वैदेही सावंत यांनी महिलांना बोलते केले. सुरुवातीला न बोलणाऱ्या महिला नंतर मोकळेपणे बोलायला लागल्या. व्याख्यानाचे रूपांतर चर्चेत झाले. चर्चेनंतर गावात डॉक्टर यावेत, शैक्षणिक सहल काढावी, महिलांचे उद्योग व्यवसाय प्रशिक्षण घ्यावे, बालस्नेही गाव करताना शाळेतील मुलांना ड्रायफ्रूट द्यावेत असे ठराव केले गेले. चक्रभेदी सोशल फौंडेशन संस्था शिव्या मुक्त गाव अभियान राबवत आहे. तर तुम्हाला वाटत का आपला गाव शिव्यामुक्त व्हावा? असा प्रश्न महिलांना विचारला असता सर्व महिलांनी याला दुजोरा दिला, हा विषय उचलून धरला आणि आपली मत मांडली हा ठराव व्हावा असा आग्रह धरला. जर गावात कोणी शिव्या दिल्या तर त्यांना ५००/-रुपये दंड लावावा असे महिलांनी सुचवले, असा ठराव संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिलांनी केला. अशा प्रकारचा ठराव कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच होत आहे.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षी हुमणे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सपना हुमणे,ग्रामस्थ बबन हुमणे, दिनकर हुमणे, ग्रामसेवक श्री.व्ही. पी.पावरा,
उपशिक्षिका पल्लवी पवार, उपशिक्षक शिवाजी साळवे. राजेश हुमणे ग्रामपंचायत क्लार्क यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ सदस्य संदिप पाष्टे यांनी गावातील अनेक प्रश्नावर उत्तम चर्चा घडवून आणली.
सौ. तृप्ती हुमणे,श्रीम. सोनाली यादव,श्रीम. दिपश्री दामोदर हुमणे यांनी उत्स्फूरपणे मनोगते मांडली. त्यात त्यांनी आजचे मार्गदर्शन आमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणार आहे असे सांगितले. मुख्याध्यापक ऋषिकांत पवार यांनी आभार मानले.
गावासाठी ऐतिहासिक घटना
पं. स.सदस्य रविन्द्र आंबेकर यांनी असे ठराव होणं व शिव्या मुक्त गावचा ठराव होणं ही आमच्या गावात ऐतिहासिक घटना आहे. त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.