मुंबई :- राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू मिळणार आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या निर्णयाची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होण्याची शक्यता आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत. ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळाला आहे. त्या ठिकाणी वाळू घाटांचं लिलाव होईल. तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती- वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आपण तयार करत आहोत. त्यासाठी एम सँड धोरण येत आहे. त्यामध्ये दगड खाणींमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रशरसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्यामाध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून, त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल. तसेच येत्या दोन वर्षांत वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर होईल.