जाकादेवी /संतोष पवार:-दापोलीतील स्नेहदीप संचालित इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयातील कु. तेजल दिनेश कदम हिची यावर्षीच्या इस्रो भेटीसाठी निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे.
इस्रोची क्षेत्रभेट व अभ्यास दौरा यासाठी दरवर्षी जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निरीक्षण, अभ्यास, प्रेरणा व प्रोत्साहन यासाठी ही मुले निवडली जातात. यावर्षी दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मिळालेली अपूर्व संधी आहे. जिल्हा समाज कल्याण कार्यालयाने दिव्यांगांसाठी दिलेले ही अनमोल भेट आहे. कु. तेजलच्या या यशासाठी नुकताच इंदिराबाई वामन बडे विद्यालयात तिला शुभेच्छा देण्यासाठी कौतुक सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिच्यासोबत तिचे पालक, शिक्षक, कर्मचारी वर्ग, हितचिंतक, संस्था चालक उपस्थित होते.
हा अभ्यास दौरा दिनांक १६ ते २० मार्च दरम्यान इस्रो येथे होणार आहे. कु.तेजल सोबतच रत्नागिरीतील द. न्यू. एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील कु. अनन्या मूरकर हीची सुद्धा निवड झाली आहे. तसेच या शाळेतील विशेष शिक्षिका श्रीमती सीमा मुळ्ये यांचाही या अभ्यास दौऱ्यात समावेश आहे. कु. तेजलच्या या निवडीबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.