जाकादेवी/वार्ताहर:-रत्नागिरी तालुक्यातील शेतकरी प्रकाश तानाजी डावल यांच्या मालकीचा बैल बिबट्याने ठार केला असून यामुळे या गरीब शेतकऱ्याचे सुमारे १६ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
ही घटना बुधवारी १२ रोजी रात्री घडली. प्रकाश डावल यांचा हा शेतीकामाचा उपयुक्त बैल होता. बुधवारी रात्री बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केला.पंचनामास्थळी वनविभागाचे श्री. गावडे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. ओरी गावात सध्या बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ओरी ग्रामस्थांनी केली आहे. ओरीसह विल्ये मांजरे ,पोचरी, तरवळ आदी भागात बिबट्याचा मुक्त संचार अनेकांना आढळून आला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या या बिबट्याचा लवकरच बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.