18 महिन्यानंतरही शेतकरी नुकसानभरपाईची पासून वंचित, दीड लाखांचे नुकसान
राजापूर : तालुक्यातील शीळ भंडारवाडी येथील शेतकऱ्याची गीर जातीची गाय जलजीवन योजनेसाठी खोदलेल्या चरात पडून मृत्युमुखी पडल्याची घटना 5 ऑगस्ट 2023 रोजी घडली होती. या दुभत्या गायींची नुकसानभरपाई मिळावी यासाठी सचिन सुधाकर बिर्जे (39, शीळ भंडार वाडी) यांनी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. मात्र अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याने 18 महिन्यानंतरही शेतकरी वंचित आहे.
बिर्जे यांनी गुजरातवरून गिर गाय आणण्यासाठी स्टेट बँकेचे 1 लाख 59 हजारांचे कर्ज घेतले होते. यामध्ये त्यांनी गोठा बांधून गायीच्या निगरणीची व्यवस्था केली होती. मात्र गाय घेऊन महिनाभरातच जलजिवन योजनेच्या खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडली. त्यामुळे त्यांचे दीड लाखाचे नुकसान झाले. शिवाय 18 महिने हप्ते न भरल्याने स्टेट बँकेने त्यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीत त्यांनी मूळ रक्कम 1 लाख 59 हजार 379 आहे. तसेच व्याजाची रक्कम 20 हजार 273 रुपये आहे. एकूण रक्कम 1 लाख 79 हजार 652 रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे. मात्र एवढी रक्कम बिर्जे भरणार कुठून? गायीपासून कोणतच उत्पन्न मिळालेलं नाही. शिवाय खर्च ही जास्त झाल्याने त्यांच्यासमोर आता मोठे संकट उभे आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळत नाही आणि उत्पन्नाचं साधनही नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशा विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या आडमुठे धोरणाचा फटका बसत आहे.
नुकसान भरपाई मिळावी म्हणून बिर्जे हे तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाणी विभाग मध्ये वारंवार फेऱ्या मारत आहेत मात्र निगरगट्ट प्रशासन अधिकारी टाळाटाळ करत आहेत. एकीकडे शासन शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देते तर दुसरीकडे त्याच शेतकऱ्याचे खच्चीकरण करण्याचं काम करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.