रत्नागिरी:- जिल्ह्यातील १३०३ गावांमध्ये गेल्या सलग तीन वर्षांमध्ये हिवताप अर्थात मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे ही कीटकजन्य आजारमुक्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
डॉक्टर आठल्ये यांच्यासह जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सर्वेक्षण, उपाययोजना आणि आरोग्यशिक्षण या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी करत असलेल्या एकत्रित प्रयत्नांतून हे यश साध्य झाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, यापुढेही ही संकल्पना नियमितपणे आणि प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत.उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या टंचाईमुळे घरात भांड्यांमध्ये, कंटेनरमध्ये जास्त काळासाठी पाण्याचा साठा केला जातो. हे पाणीसाठे जास्त काळ उघड्या अवस्थेत राहिले, तर त्यात डासांच्या अळ्या तयार होऊन डास उत्पत्ती होते. परिणामी, मलेरिया-डेंग्यूसारख्या कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी पाणीसाठे व्यवस्थित झाकून ठेवावेत. तसेच आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये केले आहे.
मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग निर्मूलनाच्या मोठ्या ध्येयाकडे हे एक पाऊल आहे. जागतिक आरोग्य संघटनांनी २०३०पर्यंत मलेरिया निर्मूलनाचे आवाहन केले आहे. दर वर्षी असंख्य व्यक्तींना त्याचा त्रास होतो. तथापि, मच्छरदाण्यांचे वितरण, ऑइल बॉल पद्धत, नियमित रक्तनमुना तपासणी, कंटेनर तपासणी, टेमेफोस, कीटकनाशक फवारणी आणि व्यापक जागरूकता मोहिमा यांसह व्यापक प्रतिबंधात्मक उपायांच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. कीटकजन्य आजारमुक्त गाव या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करू, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी म्हटले आहे.