रत्नागिरी:- आधीच कोकण विकासापासून वंचित आहे. कोकणात न झालेल्या विकासाचा फटका सर्वच धर्मीयांना बसलेला आहे. त्यात धार्मिक कट्टरतावाद, धार्मिक द्वेष वाढीस लागेल,धार्मिक सलोखा बिघडेल अशा घटना घडल्या आणि त्यावर शासनाने वेळीच कारवाई केली नाही तर याचा सर्वाधिक फटका कोकणच्या विकासाला बसेल असे स्पष्ट मत गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.शांत असणारे कोकण धार्मिक द्वेषाची प्रयोगशाळा होणार नाही याची काळजीही शासन यंत्रणेने घ्यावी असेही खंडागळे यांनी म्हटले आहे.
कोकणातील धार्मिक सलोखा हा राज्यात आदर्श असताना ऐन सणासुदीच्या दिवसात अचानक धार्मिक द्वेष निर्माण होईल अशी वक्तव्य व कृती करणाऱ्यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करायला हवी. धार्मिक द्वेष निर्माण करू पाहणाऱ्यांना शासन वेळीच अटकाव करेल का ?असा सवाल गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केला आहे.
धार्मिक द्वेष पसरवणारी व्यक्ती ही कोणत्याही धर्मातील असेल तर त्यावर वेळीच शासन यंत्रणेने भूमिका घ्यायला हवी.मागील अनेक वर्षांचा इतिहास पाहिला तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदू, मुस्लिम, बौद्ध व अन्य धर्मीय तसेच सर्व जाती धर्माचे लोक हे गुण्यागोविंदाने,आनंदाने वावरताना दिसतात. एकमेकांच्या धार्मिक सणांचा आदर करणे ही कोकणची नेहमीच संस्कृती राहिली आहे.कोकणात अशी अनेक उदाहरणं देता येतील जिथे धार्मिक एकोपा जपला जातो. असे असताना मागील दोन-तीन वर्षात अचानक कोकणात धार्मिक द्वेषाची बीजे पेरण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे का? या संदर्भात शासनातील जाणकारानी लक्ष घालायला हवे व कोकणी जनतेने देखील याचा विचार करायला हवा असे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.
कोणत्याही पद्धतीचा कट्टरतावाद कोकणात नको असेही खंडागळे यांनी म्हटले असून धार्मिक द्वेषामुळे कोकण विकासापासून कोसो दूर जाईल अशी भीतीही खंडागळे यांनी या विषयावर बोलताना व्यक्त केले आहे.
ज्यांचं लहानपण कोकणात गेल आहे त्यांनी कोकणातील धार्मिक सलोखा पाहिलेला आहे. कुणाकडून काय खरेदी करायचं यासंदर्भात वाद कोकणात कधीच झाले नाहीत. धार्मिक सणांमध्ये एकमेकांच्या उत्सवामध्ये सहभागी होणं आणि एकमेकांना सहकार्य करणं ही कोकणची परंपरा राहिली आहे.या परंपरेला छेद देण्याचे काम अलीकडच्या काळात होत आहे का?अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर शासन कठोर कारवाई करणार आहे का? असा सवाल खंडागळे यांनी केला आहे. शासनात जबाबदार पदावर असणाऱ्या कोकणातील व्यक्तींनी कोकणात कायमस्वरूपी धार्मिक सलोखा राहील व कोणत्याही धर्मीयांमध्ये वाद होणार नाहीत यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही खंडागळे यांनी म्हटले आहे.