चिपळूण : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूणच्या उड्डाणपुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चौकशी सुरू असली तरी आमच्या पातळीवर कारवाई करताना संबंधित ठेकेदाराला 50 लाखाचा, तर पुलाचे डिझाईन करणाऱ्या अभियंत्याला 20 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सद्यस्थितीत पुलाचे काम सुरू असून ते जानेवारी 26 पर्यंत पूर्णत्वास जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
महामार्गाचे दीर्घकाळ रखडलेले काम, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बहादूरशेख नाक्यातील कोसळलेला पूल, परशुराम घाटामध्ये खचलेला भराव, वाहून गेलेल्या संरक्षक भिंती याबाबत आमदार भास्कर जाधव यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री भोसले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सद्यस्थितीत चिपळूणच्या उड्डाणपुलाचे काम 50 टक्के पूर्णत्वास गेले आहे. सध्या गर्डर लॉचिंगचे काम सुरू आहे. या पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सबंधित ठेकेदाराला दंड ठोठावतानाच पुलाचे सध्या सुरू असलेले नवीन कामही त्याच्या खर्चातूनच करून घेतले जात आहे. त्याला आम्ही वेगळं काही देणार नाही. त्यामुळे कुणाला पाठीशी घातले जात नाही आणि जाणारही नाही. कोकणातील महामार्ग चौपदरीकरणात इंदापूर, माणगांव बायपाससाठीच्या निविदा प्रक्रिया सुरू आहेत. त्यापुढे त्यांना काम करण्यासाठी 11 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. संगमेश्वरचा टप्पा काहीसा मागे पडला आहे. गणेशोत्सवात वाहतूक कोंडी होऊ नये, यादृष्टीने पावसाळ्यापूर्वी सर्व्हीस रोड सुस्थितीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परशुराम घाटात पावसाळ्यात संरक्षक भिंती ढासळल्या. तेथील दगड थोडा ठिसूळ आहे. त्यामुळे आपण डिझाईन बदलले आहे. आता नव्या डिझाईननुसार सध्या कामे केली जात आहेत. तेही काम संबंधित ठेकेदाराकडून करून घेतले जात आहे. त्यासाठी वेगळा निधी दिला नसल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.