देवरूख:-संगमेश्वर तालुक्यातील देवरुख एस. टी. आगाराला ५ नवीन अत्याधुनिक बसेस मिळाल्या असून या बसेसचा लोकार्पण सोहळा काल बुधवारी सायंकाळी युवा नेते अनिरुद्ध निकम यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. देवरूख आगारात नवीन बसेस दाखल झाल्यामुळे बस कमतरतेचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागल्याचे बोल एसटीप्रेमींमधून उमटत आहेत. देवरूख आगाराला नवीन बसेस मिळाव्यात यासाठी आमदार शेखर निकम आणि देवरुखचे एसटीप्रेमी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून आगाराला ५ नवीन बसेस मिळाल्या आहेत. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
देवरुख एस. टी. आगारातील बसेसच्या कमतरतेमुळे आगाराला मोठी कसरत करावी लागत होती. तसेच बसेस वेळेवर सुटत नसल्यामुळे आगाराच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होत होता. आगारात बसेसची संख्या अपुरी असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. जुन्या बसेस सतत बिघडणे, प्रवासात अडथळे येणे, पावसाळ्यात बसेस गळणे यामुळे प्रवाशी हैराण होत होते. स्थानिक नागरिक, प्रवासी संघटना, ‘आपले देवरुख – सुंदर देवरुख’ ग्रुप, ʼ३६१९ देवरुखची राणी प्रेमी मित्र परिवार’ यांनी हा मुद्दा वारंवार उपस्थित केला आणि आमदार शेखर निकम यांच्याकडे निवेदन दिले. सदर प्रश्नाची गंभीर दखल घेत आमदार शेखर निकम यांनी तात्काळ परिवहनमंत्र्यांना पत्र पाठवून नवीन बसेस मिळाव्यात यासाठी आग्रह धरला. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनातही त्यांनी हा प्रश्न प्रभावीपणे मांडला.
देवरूख आगाराला बसेस मिळण्यासाठी आमदार शेखर निकम आणि देवरुखचे एसटी प्रेमी यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. याकामी पालकमंत्री ना. उदय सामंत यांची विशेष मदत लाभली. व महायुती सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यात मोठे यश मिळाले. आगाराला या नव्या अत्याधुनिक बसेस मिळाल्याने सांगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक केले आहे. आमदार साहेबांचा हा लढा नसता तर आजही आम्हाला जुन्या बसमध्ये हाल सोसावे लागले असते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी कार्यरत असलेल्या आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांचे हे आणखी एक यश म्हणावे लागेल.
या बसेसचा लोकार्पण सोहळा काल बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला आमदार शेखर निकम काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. परंतू त्यांनी म्हटले आहे कि, देवरूख आगाराला ५ नवीन बसेस मिळाल्या असून या बसेसचा लोकार्पण सोहळा काल उत्साहात पार पडला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे या बसेसच्या लोकार्पण सोहळ्यास मला प्रत्यक्ष हजर राहता आले नाही. परंतु देवरूख आगारातील लालपरीच्या आगमनाने खूप आनंद झाला आहे. बसेसच्या या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी चिपळूणच्या माजी पंचायत समिती सभापती सौ. पुजाताई निकम, युवा नेते अनिरुद्ध निकम, देवरूख आगारव्यवस्थापक सौ. रेश्मा मधाळे, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, युयुत्सू आर्ते, एसटी प्रेमी निखील कोळवणकर, योगेश फाटक, राजेंद्र पोमेंडकर, हनिफ हरचिरकर, बाळू ढवळे, प्रफुल्ल भुवड, पंकज पुसाळकर, मंगेश बांडागळे, प्रफुल्ल बाईत, सुशांत मुळ्ये, संतोष केदारी, अण्णा बेर्डे आदिंसह एसटी प्रेमी, प्रतिष्ठित ग्रामस्थ, एस. टी. आगारातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.