राजन लाड / जैतापूर:- त्रिवेणी संघाच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बारा वर्षांपासून महिलांकडून वेगवेगळ्या गावांत जन्म स्वागताचा उपक्रम राबवला जात आहे.
महिलांचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्तर उंचावावा म्हणून त्रिवेणी संघ या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यासोबत समाजामध्ये बेटी बचाओ हा संदेश देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवत जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘कन्या जन्म स्वागत’ कार्यक्रमही राबवला जातो. ज्या कुटुंबामध्ये कन्येचा जन्म होतो त्या कुटुंबाची त्रिवेणी संघअंतर्गत कार्यरत असलेल्या बचतगटाच्या महिला भेट घेऊन नवजात कन्येसह त्या कुटुंबाचे अनोख्या पद्धतीने स्वागत आणि सत्कार करतात.
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या चैतन्य संस्था आणि सारथी महासंघ प्रेरित त्रिवेणी संघाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत मीठगवाणे येथील जागृती गाव समितीच्या वतीने दोन नवजात कन्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जागृती गाव विकास समितीच्या मासिक मीटिंगची निमित्त साधत श्री गणेश, रिद्धी सिद्धी , शिवकन्या , विश्वजा या स्वयंसहायता महिला बचत गटाच्या महिलांनी सुतारवाडी येथील सचिन व सुनील मिस्त्री यांच्या घरी जात त्यांच्या नवजात कन्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत केले.
मागील बारा वर्षांपासून कन्या जन्म स्वागताचा हा उपक्रम राबविला जात आहे. बारा वर्षांपूर्वी ज्या मुलींच्या स्वागताने या उपक्रमाची सुरुवात झाली होती आज बारा वर्षानंतर त्याच मुलींच्या हस्ते छोटीशी भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी जागृती ग्राम विकास समितीचे अध्यक्ष वसुधा पावसकर, संघ पदाधिकारी दिपाली कुवेस्कर, सचिव पंकजा नेवरेकर खजिनदार अश्विनी कुवेस्कर, विश्वजा गटाच्या ज्येष्ठ सदस्या श्रीमती तारामती सुतार, संघ कार्यकर्त्या प्रतिभा मोहिते, व्यवस्थापक राजन लाड यांसह सर्व गटातील महिला सदस्य उपस्थित होत्या.