पुणे: ऐन मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यातच राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढू लागला आहे. त्यामुळे उष्णतेचा कहर दिसून येत आहे. राज्यात बुधवारी (दि. 12) अकोला जिल्ह्याचे कमाल तापमान 39.5 अंशांवर पोहचले, तर अहिल्यानगर भागाचा किमान तापमानाचा पारा 16.7 अंशांवर आहे.
दक्षिण भारताकडून येणार्या दमट आणि उष्ण वार्यांमुळे राज्यातील कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येणार असून, पारा 40 अंशांच्या आसपास पोहचण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, अकोला. चंद्रपूर या जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणार आहे.
राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती. आता मात्र कमाल तापमानात तीव्रवाढ होऊ लागली आहे. त्यामुळे अगदी सकाळपासूनच उकाडा वाढला आहे. दरम्यान विदर्भ, कोकण या भागातील बहुतांश जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येणार आहे.
दक्षिण भारताकडून राज्याकडे दमट आणि उष्ण वारे वाहू लागल्यामुळे राज्यात ही उष्णतेची लाट येणार आहे. त्यातच हवामान कोरडे राहणार असल्यामुळे उन्हाच्या तीव्रतेत वाढ होईल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.