मुंबई:- राज्यात विशेषत: कोकणात काजू उत्पादन वाढ आणि प्रक्रियेसंदर्भात विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषदेत नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना श्री.रावल बोलत होते.
पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्रामध्ये नव्याने काजू बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. नुकतेच काजू बोर्डाचे कामकाज प्रत्यक्ष सुरू झाले असून बोर्डावर संचालक मंडळ, अधिकारी यांची नेमणूक झाली आहे. रत्नागिरीचे काही तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांसह त्यांचा अभ्यास दौरा झाला आहे. या दौऱ्यातून काजूचे उत्पादन वाढण्यासंदर्भात अभ्यास करण्यात आला आहे.
पणन मंत्री श्री.रावल म्हणाले, भारतात सर्वात जास्त काजू विक्री होते. काजूवर प्रोसेसिंग करणे देखील गरजेचे असते. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहकार्यातून मॅग्नेटच्या माध्यमातून काजू प्रोसेसिंगला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाणार आहे. गाव पातळीवर फार्मर प्रोड्यूसर संस्था असतात. त्यांचे राज्यव्यापी संघटन तयार करुन स्टेट लेव्हल असोसिएशन (एसएलए) निर्माण केल्यानंतर ते राज्य स्तरावर काम करतात. राज्यामध्ये जवळपास ४६ एसएलए आहेत. याबाबत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एक समिती तयार करण्यात आली असून पात्र ठरणाऱ्या संस्थाच एसएलए होऊ शकतील, या समितीचा अहवाल आल्यानंतर यामध्ये सुसूत्रता येईल, असा विश्वास श्री.रावल यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदी झाली आहे. अजूनही याबाबत केंद्राकडे आपण मुदतवाढ देण्यासाठी मागणी केली असल्याचेही श्री.रावल यांनी यावेळी सांगितले.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सदाशिव खोत, राजेश राठोड, कृपाल तुमाने, सत्यजित तांबे, शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ या सदस्यांनी विधानपरिषद नियम 260 अन्वये आपली भूमिका मांडली होती.