विशेष पोलीस महानिरीक्षकांनी घेतली दखल
चिपळूण (प्रतिनिधी) : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचे, त्यांना नाहक त्रास देण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत या विरोधातील तक्रारी उद्योजकांनी नुकत्याच लोटे दौऱ्यात कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्यासमोर मांडल्या. यावर कुठल्याही उद्योजकांना कोणी व्यक्ती अथवा संघटना विशिष्ट हेतूने नाहक त्रास देऊन ब्लॅकमेलिंग करत असतील तर त्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असे आश्वासन दराडे यांनी उद्योजकांना दिले.
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दराडे यांनी नुकतीच लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्योग भवन येथे भेट दिली. यावेळी लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्यावतीने पोलीस महानिरीक्षक दराडे यांचा सन्मान करण्यात आला. उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अॅड. राज आंब्रे यांनी प्रास्ताविकात लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा गोषवारा केला आणि पोलीस महानिरीक्षकांना याबाबत लक्ष घालून सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी बोलताना पोलीस महानिरीक्षक दराडे यांनी संपूर्ण पोलीस खाते उद्योजकांच्या पाठीशी आहे. उद्योजकांना नाहक त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही करतो. मात्र उद्योजकांकडूनही काही चुका झाल्या तर त्याकडेही पोलीस खात्याचे लक्ष असणार आहे. लोटे-परशुराम औद्योगिक वसाहत दिवसेंदिवस प्रगती करत आहे. परिणामी येथील लोकवस्ती आणि रहदारी वाढली आहे. म्हणून लोटे येथे पोलीस दूरक्षेत्राऐवजी अद्ययावत पोलीस स्थानकाची गरज आहे. या बाबत उद्योजक संघटनेकडून आलेला प्रस्ताव आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहून पुढे पाठवला आहे आणि लवकरच येथे नवीन पोलीस स्टेशन असेल, असेही आश्वासन दिले. यावेळी विनती ऑरगॅनिकचे जनसंपर्क अधिकारी सचिन खरे यांनी औद्योगिक वसाहतीत कंटेनर, टँकर यांसारखी अवजड वाहने नेहमी ये-जा करत असतात. या वाहनांना चौपदरीकरण झालेल्या महामार्गावरून अपेक्षित कारखान्याकडे जाताना सोयीचे व्हावे, यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडे विनंती करून आम्हास योग्य ती सोय करून द्यावी, अशी ही विनंती पोलीस महानिरीक्षकांना उद्योजकांच्यावतीने केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, खेडचे पि पोलीस निरीक्षक नितीन भोयर, लोटे पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक संजय पाटील, रत्नागिरी गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी, घरडा केमिकल्सचे आर. सी. कुलकर्णी, आनंद भोसले, एक्सेल इंडस्ट्रीजचे आनंदा पाटणकर, सुप्रिया लाईफ सायन्सचे संजय सावंत, विश्वास जोशी, मिलिंद बारटक्के, राजेश तिवारी यांसह उद्योजक व पंचक्रोशीतील पोलीस पाटील उपस्थित होते.