रत्नागिरी:- वैदिक मार्तंड आणि वैदिक शिरोमणी वे. मू. (कै.) विनायक सीताराम आठल्ये गुरुजी आणि व्याकरणाचार्य (कै.) पुरुषोत्तम ना. फडकेशास्त्री यांच्या नावाचा पुरस्कार दोघांचेही आशीर्वाद या भावनेने मी अत्यंत विनम्र भावनेने स्वीकारत आहे.
यातून त्यांच्याप्रमाणे अजून किती पुढे गेले पाहिजे, याची जाणीव होऊन प्रेरणा मिळाली आहे, असे प्रतिपादन पुण्यातील वेदमूर्ती घनपाठी प्रकाश दंडगे गुरुजी यांनी केले.
वे. मू. (कै.) आठल्ये गुरुजी आणि (कै.) फडकेशास्त्री या वेद आणि शास्त्रातील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाडगाव येथील संस्कृत पाठशाळेत विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात वे. मू. दत्तात्रेय मुरवणे गुरुजी, अनंतशास्त्री मुळे, जयराम आठल्ये यांच्या हस्ते दंडगे गुरुजींचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
दंडगे गुरुजी म्हणाले, की, आठल्ये गुरुजी आणि फडके गुरुजींनी दाखवलेल्या मार्गाने शिष्यांचा प्रवास चालू आहे, याबद्दल आयोजकांचे मी मनापासून कौतुक करतो. एक चांगला उपक्रम राबवत आहात. महाराष्ट्रातील वेदपाठशाळांची स्थिती कशी आहे, विद्यार्थी, इमारतींची परिस्थिती, अध्ययन कशा पद्धतीने चालते, निवास आणि अन्य काय व्यवस्था आहेत आणि गरजेच्या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणण्यासाठी आम्ही एक संस्था स्थापन करायचे ठरवले. महाराष्ट्रातील सर्व वेदपाठशाळा जोडून घ्यायच्या आणि त्यांना काय साह्य करता येईल ते एकत्र येऊन पाहिल्यास विद्यार्थी विनाअडथळा अध्ययन करू शकतात. अशी एक संस्था चालू केली. शृंगेरीच्या शंकराचार्य स्वामींच्या कानावर हा विषय घालण्यासाठी आम्ही त्या वेळी सातारा येथे विवेकशास्त्री गोडबोले यांच्या वेदपाठशाळेत गेलो. तेथे स्वामींचा चातुर्मास चालू होता. तेव्हा फडकेशास्त्री यांची कन्या आशाताई गुर्जर यासुद्धा आल्या होत्या. रत्नागिरीतील फडकेशास्त्रींची कन्या असे म्हटल्यानंतर स्वामींनी स्वतः फडकेशास्त्रींबद्दल चौकशी केली. शंकराचार्यांसारखी व्यक्ती फडकेशास्त्री यांना नावानिशी ओळखते, म्हणजे ते किती महनीय होते, हे लक्षात येईल.
आठल्ये गुरुजींनी सहा कंठस्थ घनपारायणे केली हा आजवरचा एक उच्चांकच म्हणावा लागेल. अजून तो कोणीही मोडलेला नाही. ते स्वतः पारायण करत असत आणि घनपारायणाचे निरीक्षक म्हणूनही अनेक ठिकाणी जात असत. वे. मू. कै. आठल्ये गुरुजी बाहेरगावी कोणत्याही स्वाहाकार अनुष्ठानाला गेले, तरीही सकाळचे आन्हिक झाल्यावर गुरुचरित्राचा एक अध्याय वाचून पूर्ण करणारच ही त्यांची श्रद्धा होती, कर्तव्यपरायणता होती. हा पुरस्कार स्वीकारण्याची माझी योग्यता नाही; पण त्यांचे आशीर्वाद या भावनेने मी हा पुरस्कार अत्यंत विनम्र भावाने स्वीकारत आहे, अशा भावना दंडगे गुरुजींनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, माझा आणि आठल्ये गुरुजींचा ४० वर्षे जुना परिचय. अध्ययन करत असल्यापासून अनेक वेळा त्यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला मिळाले. ते कडक शिस्तीचे होते. १९८१ साली बेंगळुरू येथे कोटी गायत्री यज्ञात १२०० ब्राह्मणांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात आठल्ये गुरुजी, सम्राट पाध्ये गुरुजी, घैसास गुरुजी, फणसळकर गुरुजी, भातखंडे गुरुजी उपस्थित होते. त्यांच्या सहवासाचा लाभ मला मिळाला. हे आमचे भाग्य आहे.
हभप प्रवीण मुळ्ये यांनी आठल्ये गुरुजी आणि फडकेशास्त्री यांच्या कार्याचा परिचय करून दिला. सत्कारमूर्ती वे. मू. दंडगे गुरुजी यांचा परिचय धनंजय नवाथ्ये यांनी करून दिला, तर भगवान जुवेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. सचिन आठल्ये यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले. सूत्रसंचालन सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले. ओंकार पाध्ये आभारप्रदर्शन करताना म्हणाले, रत्नागिरीत घनपारायण झालेले नाही. त्यामुळे पुढील वर्षी वेदनारायणाच्या इच्छेनुसार घनपारायण करण्याचा मानस आहे. पारायणासाठी ५० ते ५५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यादृष्टीने वे. मू. मुरवणे गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.पाच दिवसांच्या कार्यक्रमात दररोज सकाळी तेंडोलीतील घनपाठी वेदमूर्ती वल्लभ मुंडले गुरुजी यांनी ऋग्वेद संहिता पारायण केले. दररोज सायंकाळी चार ते आठ या वेळेत आळंदी येथील अनंतशास्त्री मुळ्ये यांनी ‘शिवपुराण’ या विषयावर निरूपण केले. या दोन्ही कार्यक्रमांना रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद लाभला.