रत्नागिरी:- येथील लक्ष्मी चौकातील (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाची विद्यार्थिनी अनन्या रत्नदीप मुरकर हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
दी न्यू एज्युकेशन सोसायटी आणि अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातर्फे अनन्या मुरकर आणि मार्गदर्शक, शाळेच्या विशेष शिक्षिका श्रीमती सीमा मुळ्ये यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. हा दौरा येत्या १६ ते २० मार्च या कालावधीत आयोजित केला आहे. याबद्दल अनन्या आणि श्रीमती मुळ्ये यांचा कौतुक समारंभ विद्यालयात साजरा करण्यात आला. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, मूकबधिर विभागाचे व्यवस्थापक श्री. पानगले, मुख्याध्यापक गजानन रजपूत, पालक प्रतिनिधी सौ. उषा सुर्वे आणि पालक, हितचिंतक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कौतुक समारंभ विद्यालयात साजरा करण्यात आला.
दिव्यांग प्रवर्गातून इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी प्रथमच अनन्या मुरकर आणि इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय (दापोली) या शाळेची विद्यार्थिनी तेजल कदम या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे. या दोघींचेही सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.