चिपळूण:- येथील पेठमाप भागातील समीर विद्याधर वरवाटकर यांनी सात राज्यांतून बुलेटवरून साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून एक वेगळा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा चिपळूण शहरातील हा एकमेव तरुण ठरला आहे.
समीर तथा भैया वरवटकर यांनी हा प्रवास चिपळूण ते संभाजीनगर, नागपूर, प्रयागराज महाकुंभ, वाराणसी काशी, अयोध्या, आग्रा, नैनिताल, कैचीधाम, हरिद्वार, हिमाचल प्रदेश, मंडीशराधर शिवमंदिर, चंदीगढ, अंबाला, सोनीपत, जयपूर, उज्जैन, मध्य प्रदेश, महाकाल, इंदूर, नाशिक, पुणे ते चिपळूण असा केला आहे. या प्रवासादरम्यान आपल्याला कोणताही वाईट अनुभव आला नाही, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी चिपळूण ते नेपाळ असा दोनवेळा व चिपळूण ते भूतान असा एकवेळा, अशा तीन इंटरनॅशनल राइड्स त्यांनी पूर्ण केले आहेत, लेह लडाख त्यांनी दोनवेळा पूर्ण केले आहे. चिपळूण ते कन्याकुमारी, अष्टविनायक, गोवा दहावेळा, इंडिया बाइक विक गोवा पाचवेळा, चिपळूण ते नाणेघाट, वन राइड इंडिया अशा अनेक राइड्स त्यांनी पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. मुंबईतील चेसेवाल क्लबकडून सेफेस्ट रायडर ऑफ द इयर ॲवॉर्डसुद्धा त्यांनी मिळवला आहे.
भारत भ्रमण पूर्ण होण्यासाठी आता केवळ सात राज्ये बाकी आहेत. ती लवकरच पूर्ण करण्याचा मानस त्यांनी आखला आहे. चिपळूण शहरात आल्यानंतर अनेकांनी त्यांचे भेट घेऊन कौतुक केले.