गुहागर:- गेल्या २०-२५ वर्षांत हळद लागवडीखाली जे अनुभव व ज्ञान मिळवले आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून इतर शेतकऱ्यांनी हळद लागवडीत प्रगती करावी,आम्ही मोकळेपणाने संपूर्ण मार्गदर्शन सातत्याने आपणास करत राहू,असे आवाहन राष्ट्रपतींच्या हस्ते नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त SK-4 हळदीच्या वाणाचे प्रणेते सचिन कारेकर यांनी केले.
दरवर्षीप्रमाणे एस.के.-4 ग्रुपतर्फे आबलोली (ता. गुहागर) येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात हळद लागवड ते प्रकिया याबाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते पुढे म्हणाले की आम्ही आयुष्यातील २५ वर्षे खर्च करून SK-4 ही हळदीची जात तसेच कोकणातील परिस्थितीत हळद लागवडीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.आज हे ‘रेडिमेड’ तंत्रज्ञान आपणासमोर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मांडत आहे. या ज्ञानाचा उपयोग अवश्य करावा व आपली प्रगती करावी.
हळद लागवडीला पावसाळ्यानंतर जानेवारी महिन्यापर्यंत पाणी देणे आवश्यक असल्याचे सांगून हे शक्य झाले तरच चांगल्या प्रकारे उत्पादन आपण काढू शकतो. नाहीतर उत्पादनावर परिणाम होतो, असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी केले. पाण्यात विरघळणाऱ्या रासायनिक खताचा तसेच जीवामृताचा वापर केल्याने हळदीचा गड्डा पोसण्यास मदत होते,असेही ते म्हणाले.
या प्रशिक्षणात हळद लागवडीसाठी बियाणे निवड, बियाणे साठवणूक, हळद लागवड, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर, कीड-रोग नियंत्रण, हळद लागवडीला पावसानंतरचे पाणी व्यवस्थापन , हळद काढणी, कापणीनंतर प्रक्रिया या विषयावर सविस्तर मार्गदर्शन सचिन कारेकर यांनी केले. यावेळी हळद लागवड, हळद उजळणी, हळद पॉलीश करणे याबाबत प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. श्री. पौनीकर यांनी ओल्या हळकुंडापासून रोपे तयार करण्याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे ,पालघर जिल्ह्य़ातील शेतकरी प्रशिक्षणाला उपस्थित होते. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थींनीही मनोगत व्यक्त केले.