चिपळूण : भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरची टिपरला (डंपर) धडक बसून झालेल्या अपघातात टँकरचालक जखमी झाला आहे. ही घटना रविवार दि. ९ मार्च रोजी सकाळी ७.५० वा. सुमारास निर्व्हळ येथील वळणावर घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक माणिक गौड (रा. पीचरी, आजमगड, उत्तरप्रदेश, सध्या रा. प्रभागनगर सोसायटी, चेंबूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आणि जखमी टँकर चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद राजेंद्र शशिकांत सुर्वे (२८, रा. अलोरे देऊळवाडी, ता. चिपळूण) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र सुर्वे हे जांभा दगड भरलेला टिपर (डम्पर) घेऊन तनाळी ते शिरगांव दरम्यान निघाले होते. याचदम्यान ते निर्व्हळ येथील वळणावर आले असता चिपळूण दिशेने टँकर घेऊन येणाऱ्या दीपक गौड याने आपले वाहन भरधाव वेगात चालवून, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या टिपरला जोरदार धडक दिली. यामध्ये गाड्यांचे नुकसान झाले असून या अपघातात दीपक गौड हादेखिल जखमी झाला आहे.