शिना बोरा हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती?
रायगड: मुंबई – गोवा महामार्गालगत एका सुटकेसमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. पेण तालुक्यातील दुरशेत फाटा येथील नदी किनारी एका सुटकेसमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरातून उग्र वास येत असल्याने स्थानिकांनी शोध घेतला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुरशेत फाटा येथील बाळगंगा नदीकिनारी स्थानिकांना एक मोठी सुटकेस आढळून आली. याच सुटकेसमधून उग्र वास येत असल्याने गावचे सरपंच दशरत गावंड यांनी संबधित घटनेची माहिती गावच्या पोलिस पाटलांना दिली. पोलिस पाटलांनी पेण पोलिसांनी माहिती देताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुटकेस उघडून पाहिली असता त्यात ३५ ते ४० वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला.
पेण पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. महिलेची ओळख अद्याप पटली नसून, तिच्या हातावर मात्र एक टॅटू आढळून आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांत महिलेचा खून करुन मृतदेह सुटकेसमध्ये बंद करुन याठिकाणी फेकला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, “स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले जात आहेत”, असे बागूल म्हणाले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षापूर्वी शिना बोराची देखील हत्या करुन तिचा मृतदेह पेणच्या जंगलात जाळण्यात आला होता. याशिवाय मुंबईतील दोन व्यावसायिकांची हत्या करुन मृतदेह रायगड मधील मुंबई – गोवा महामार्गालगत फेकण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मृतदेह परिसरात सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी सक्त कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी करत आहेत.