मुंबई : राज्य शासनाची लोकप्रिय योजना आनंदाचा शिधा योजना आता बंद करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून सणाच्या दिवशी राज्यातील 1 कोटी 63 लाख लोकांना याचा लाभ मिळत होता.
सध्या राज्यातील तिजोरीमध्ये खडखडाट असल्यामुळे ही योजना बंद करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
आनंदाचा शिधा योजनेच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत मिळत होते. आता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा योजनेला बगल दिल्याचे दिसत आहे. सदर योजनेच्या माध्यमातून दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंती अशा सणांच्या निमित्ताने फक्त 100 रुपयांमध्ये पाच वस्तू दिल्या लाभार्थी नागरिकांना मिळत होत्या.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीकडून अनेक योजनांची घोषणा करण्यात आली होती. सोमवारी (दि. १०) सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक योजनांना निधीचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये आनंदाचा शिधा या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे आनंदाचा शिधा ही योजना आता बंद झाल्याचे समोर आले आहे.