मुंबई:- राज्य अधिस्वीकृती समितीच्या रविवारी, ९ मार्च रोजी झालेल्या बैठकीत अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोज जालनावाला यांची निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील विशेष समिती कक्षात ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांच्या अध्यक्षतेखाली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कोकण विभागाच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी, समितीचे सचिव तथा संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागूल, छत्रपती संभाजीनगरचे संचालक किशोर गांगुर्डे, नागपूर विभागाचे संचालक डॉ.गणेश मुळे व इतर समिती सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
कोकण विभागीय अध्यक्ष कृती समितीचे यापूर्वीचे अध्यक्ष श्री. श्रीकांत चाळके यांनी वैद्यकीय कारणास्तव त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या सर्वानुमते श्री.मनोज जालनावाला यांना कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले.
यावेळी या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते श्री.मनोज जालनावाला यांचा सत्कार करण्यात आला.
नवनियुक्त अध्यक्ष श्री. मनोज जालनावाला यांचे संपूर्ण कोंकण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.