रत्नागिरी:- गेली २५ वर्षे आपल्या सुरेख हस्ताक्षराने जनसेवा ग्रंथालयाचे ‘शब्दांकुर’ हे दिवाळी हस्तलिखित लिहिणार्या सुजाता कोळंबेकर यांना बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जागतिक महिलादिनानिमित्ताने पार पडलेल्या या कार्यक्रमात सुजाता कोळंबेकर यांचा शाल-श्रीफळ, सन्मानपत्र, रोख रक्कम, पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. सुजाता कोळंबेकर जनसेवा ग्रंथालयात कार्यरत असून ‘शब्दांकुर’ हस्तलिखिताचे त्या एकटाकी लेखन करतात. लेखकांकडून आलेले साहित्य, त्यानंतर त्यातील मजकूर समजून उमजून घेणे आणि जवळपास १०० पानांचे हस्तलिखित लिहिणे, हे काम त्या गेली २५ वर्षे आपली नोकरी सांभाळून करत आहेत. मोबाईल, टॅबसारख्या दुनियेत हस्तलेखनाची प्राचीन परंपरा मागे पडत असताना, त्यांनी जोपासलेल्या परंपरेची दखल घेऊन बोडस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे त्यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्कार देण्यात आला.
जनसेवा ग्रंथालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या निवृत्त शिक्षिका, समाजसेविका प्रतिभा प्रभुदेसाई यांच्या हस्ते सुजाता कोळंबेकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी बोडस प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. उदय बोडस, खजिनदार आदिती पटवर्धन, जनसेवा ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष राहुल कुलकर्णी, वैशाली लिमये, डॉ. शरद प्रभुदेसाई, श्री. नानिवडेकर, भाग्यश्री पटवर्धन, अमोल पालये आदी मान्यवर उपस्थित होते.