राजापूर:- कला, क्रीडा, सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि सर्वधन करण्यासाठी राजापूर प्रतिष्ठानने रविवारी (ता.१६) शहरातील गुजराळी येथील यशोदिन सृष्टी येथे पालखी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात ग्रामदेवतांच्या पालख्या देवदेवतांसह, पारंपारीक खेळे, ढोल ताशांसह सहभागी होवून शिमगोत्सवातील पारंपारिक नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.
शिमगा हा कोकणातील पारंपरिक उत्सव आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तरूण पिढीला आपल्या रूढी, परंपरा, सण यांचा विसर पडू लागला आहे. अशावेळी निखळ आनंद मिळवून देणाऱ्या आपल्या परंपरागत संस्कृतीची ओळख व त्याची जाण नव्या पिढीला व्हावी तसेच काळाच्या प्रवाहात लुप्त होवू पाहणाऱ्या कोकणातील संस्कृती आणि कलेचे जतन व्हावे या उद्देशाने या पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. दिवसभर पालखी महोत्सव सोहळा रंगणार असून त्यामध्ये सहभागी झालेल्या गावांच्या ग्रामदेवतांच्या पालख्या निर्धारीत वेळेत पालखीनृत्य, टीपरीनृत्य, ढोल नृत्य यांचे सादरीकरण करणार आहेत. या महोत्सवातून कोकणच्या लोकसंस्कृतीचे दर्शन होणार आहे.
पालखी महोत्सवासाठी अध्यक्ष मोहन पाडावे यांच्या नेतृत्वाखाली नंदकुमार पुजारे, अशफाक मापारी, प्रकाश कातकर, गोपाळ गोंडाळ, सुधीर विचारे, राजू कार्शिंगकर, सुभाष नवाळे, संदीप पवार, प्रकाश पुजारे आदी मंडळी परिश्रम घेत आहेत. यातून कोकणच्या लोकसंस्कृतीचा जागर व्हावा, नव्या पिढीत याविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा असा प्रामाणिक हेतू असून तरूण पिढीसह अबाल वृध्दांनी या सोहळ्याला उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन राजापूर प्रतिष्ठानने केला आहे.