शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीतर्फे महिला दिन उत्साहात
रत्नागिरी:- “तुम्ही सक्षम असाल, तरच पुढची पिढीही सक्षम होणार आहे. त्यामुळे आधी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या,” असे आवाहन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीतर्फे स्व. मीनाताई ठाकरे पुरस्कार वितरण सोहळा साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित केला होता. त्यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर
शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक ममता जोशी, महिला दक्षता समितीच्या गायत्री पाटील, श्रीमती राऊळ, माजी नगरसेविका सौ. राजश्री शिवलकर, माजी नगरसेविका सौ. रशीदा गोदड, सेजल बोराटे, जिल्हा समन्वयक संजय पूनसकर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुमारे ३०हून अधिक महिलांना स्व. मीनाताई ठाकरे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोकणात स्त्रियांना खूप मान, आदर दिला जातो. इथे मुलगी झाली तर निराश होत नाही असे सांगतानाच डॉ. शिंदे पुढे म्हणाल्या, “महिला दिन हा एका दिवसापुरता मर्यादित नसावा. महिलांच्या आरोग्याचा विचार केला तर तो शारीरिक आणि मानसिक अशा दोन भागात करायला हवा. शरीराने स्वस्थ दिसणारी महिला मनाने स्वस्थ असेलच असे नाही. त्यामुळे महिलांचे मानसिक आरोग्य जपणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.”
“आज सगळीकडेच पुरुष आणि स्त्री समानता साजरी करत असताना महिलांनी ही आपली मानसिकता बदलायला हवी. केवळ मुलांचा हट्ट न धरता मुलीच्या जन्माचेही स्वागत करायला हवे. मुलीलाही समान अधिकार असायला हवा, असेही मार्गदर्शन करताना डॉ. शिंदे यांनी सांगितले. आजकाल मोबाईल्स मधले रिल्स बघून निराश झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
जिल्हा पोलीस दलाच्या महिला दक्षता कमिटीच्या प्रमुख गायत्री पाटील यांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या उपक्रमांची माहिती दिली. सोशल मीडिया, महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुणांना प्रतिबंधक करण्यासाठी व संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना त्यांनी
कमिटी कशाप्रकारे काम करते याची माहिती दिली. तसेच शालेय मुलांवर होणारे लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध बसण्यासाठी पोलीस काका आणि पोलीस काकी ही संकल्पना राबवली जात असल्याचे सांगितले. शाळेत काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट असणे गरजेचे असल्याचे सांगतानाच शाळा सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस शाळांना भेटी देत असल्याचे त्या म्हणाल्या.
अडचणीत असताना ११२ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करतानाच १८ वर्षांखालील बालकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन १०९८ हा टोल फ्री क्रमांक, ज्येष्ठ नागरिकांसाठी १०९० हेल्पलाइन क्रमांक, तर डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन फसवणूक यांच्यासारख्या सायबर क्राईमसाठी १९३० हा क्रमांक असल्याचे आवर्जून सांगितले. ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर काही सेकंदातच १९३० या क्रमांकावर संपर्क साधला, तर फसवणूकदाराचे खाते फ्रीज करता येते. मोबाईल चा वापर चांगल्या गोष्टींसाठीच करावा, पुरेपूर काळजी घ्यावी, असे आवाहन गायत्री पाटील यांनी केले.
यावेळी महिला आघाडीच्या दिव्या पडवळ, हीना दळवी, रूपाली तावसळकर, स्मिता काटकर, राजश्री लोटणकर, उषा जाधव, क्षिप्रा बोरकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख सायली पवार उपतालुका संघटक गंधाली मयेकर, मिताली पवार, रेश्मा कोळंबेकर, विजया घुगे, उन्नती कोळेकर, तसेच उपशहर प्रमुख नितीन तळेकर, विभागप्रमुख प्रकाश गुरव, सलील डाफळे, प्रशांत सुर्वे, अमित खडसोडे, साजिद पावसकर, उपतालुका प्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख मयुरेश पाटील, नयन साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला आघाडीच्या वतीने विशेष मेहनत घेण्यात आली.